Isha Rikhi: “भीतीपोटी अनेक वर्षे गप्प राहिले…”; रॅपर बादशाहची पत्नी ईशा रिखीची भावनिक पोस्ट व्हायरल
Isha Rikhi गेल्या काही दिवसांपासून ईशा रिखी सातत्याने भावनिक आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने, "आयुष्यात येणारं प्रत्येक वादळ आपल्याला काहीतरी शिकवून जातं," असा संदेश देणारी पोस्ट केली होती. त्यानंतर आता तिने आणखी एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Isha Rikhi: ईशाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि त्याची पत्नी, पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी पुन्हा चर्चेत आले आहेत. ईशाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका भावनिक पोस्टमध्ये अनेक वर्षे भीतीमुळे आपण गप्प राहिल्याचा दावा केला आहे. या पोस्टनंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. मात्र, या प्रकरणावर बादशाहने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Isha Rikhi)
गेल्या काही दिवसांपासून ईशा रिखी सातत्याने भावनिक आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने, “आयुष्यात येणारं प्रत्येक वादळ आपल्याला काहीतरी शिकवून जातं,” असा संदेश देणारी पोस्ट केली होती. त्यानंतर आता तिने आणखी एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
ईशाने पोस्टमध्ये लिहिलं की, काही लढाया अशा असतात ज्यांचे व्रण बाहेरून दिसत नाहीत. त्या मनात खोलवर सुरू असतात. बराच काळ आपण शांत राहिलो, कारण भीती वाटत होती. पतीचा प्रभाव आणि ताकद पाहून आपण दबावाखाली होतो. त्यामुळे गप्प राहणंच सुरक्षित वाटत होतं, असं तिने म्हटलं आहे. (Isha Rikhi)
तिने पुढे स्पष्ट केलं की, तिचं मौन म्हणजे कोणत्याही गोष्टीला दिलेली संमती नव्हती. ते फक्त स्वतःला सावरण्याचा आणि परिस्थितीत टिकून राहण्याचा प्रयत्न होता. आता मात्र आपण भीतीपेक्षा धैर्याची निवड करत असल्याचं तिने सांगितलं. “मी अजून संपूर्ण सत्य सांगण्यासाठी तयार नाही. पण सर्व काही ठीक असल्याचा दिखावा करणं आता थांबवणार आहे,” असंही ईशाने पोस्टमध्ये नमूद केलं. (Isha Rikhi)

Isha Rikhi
ईशाच्या या पोस्टनंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तिच्या पाठीशी उभे राहत तिला धीर दिला. अभिनेत्री सना मकबूलने “तू खूप खंबीर आहेस,” अशी प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री प्रियल गोरने “लव्ह यू ईशू” अशी कमेंट केली. चेतना पांडेने “कधीही घाबरू नकोस” असा सल्ला दिला. तर अभिनेत्री जास्मिन भसीननेही तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करत तिला पाठिंबा दिला. (Isha Rikhi)
या पोस्टनंतर सोशल मीडियावर बादशाह आणि ईशा रिखी यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ईशाने दोघांच्या आयुष्यातील काही खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याला “प्रत्येक वादळ हा एक धडा असतो आणि प्रत्येक प्रार्थना ही एक आशा असते,” असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर आता तिने केलेल्या नव्या पोस्टमुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. मात्र, या चर्चांबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, ईशा रिखी ही बादशाहची दुसरी पत्नी असल्याचं सांगितलं जातं. याआधी बादशाहचं लग्न जास्मिन मसीह हिच्याशी झालं होतं. २०२० मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना जेसेमी ग्रेस मसीह सिंग नावाची मुलगी आहे.
ईशाच्या सोशल मीडिया पोस्टमधील विधानांमुळे अनेकांनी तिच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व बाजू समोर आलेल्या नसल्याने नेमकं काय घडलं आहे, याबाबत कोणताही ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. बादशाह किंवा ईशा रिखी यांच्याकडून अधिकृत खुलासा होईपर्यंत या चर्चांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे.





