Pune : शिक्षकांची माहिती भरण्यास सीबीएसई शाळांकडून टाळाटाळ

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शाळांकडून शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती मागविली होती. मात्र, बहुसंख्य शाळांकडून माहितीच दिली जात नसल्याची बाब उघड झाली आहे. त्याबाबत सीबीएसई बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. आता, संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अनेक वेळा सूचना देऊनही, शाळांनी अद्याप त्यांच्या वेबसाइटवर कर्मचाऱ्यांची माहिती आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत, अशा स्थितीत शाळांना शेवटची संधी दिली जात आहे. या कालावधीत शैक्षणिक संस्थांना संपूर्ण तपशील द्यावा लागेल. अन्यथा, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
वारंवार सूचना देऊनही अनेक संलग्न शाळांकडे अजूनही कार्यरत वेबसाइट नाही. जरी काही शाळांची वेबसाइट असली तरी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे त्यावर अपलोड केली जात नाहीत किंवा ती केवळ अंशतः अपलोड केली जातात. काही प्रकरणांमध्ये शाळांनी माहिती, कागदपत्रे अपलोड केली आहेत परंतु लिंक सक्रिय केलेली नाही. काही शाळांनी माहिती, कागदपत्रे अपलोड केली आहेत परंतु, मुख्यपृष्ठावर उच्चस्तरावरील त्याचे चिन्ह किंवा लिंक्स प्रदर्शित केलेले नाहीत.
या सर्व संलग्न शाळांना ३० दिवसांच्या आत संपूर्ण डेटा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शाळांनी अद्याप सूचनांचे पालन केले नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असेल. यानंतर, त्यांना दुसरी संधी दिली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.




