पिंपरी-चिंचवड शहराला दिलासा ; पवना धरण ५० टक्के भरले

पवनानगर, (वार्ताहर) : मावळ तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांसह पिंपरी-चिंचवड शहर वासियांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मावळासह पिंपरी-चिंचवड महानगराची तहान भागविणारे पवना धरण ५० टक्के भरले आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या आकडेवारीनुसार पवना धरणाने पन्नाशी ओलांडली असून पवना धरणात ५०.९७ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.
सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ४९.३० टक्के भरलेले पवना धरण मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे ५१ टक्क्यांच्या जवळपास पोहोचले. गेले आठवडाभरपासून पवना धरणाच्या बॅक वॉटर भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून ओढे, प्रवाह दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची आवक अशीच राहिल्यास आणि पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसात पवना धरण १०० टक्के भरून नागरिकांना दिलासा मिळेल.
मंगळवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजताची आकडेवारी –
पवना धरणातील पाणीसाठा – ५०.९७ टक्के
मागील २४ तासातील पाऊस – ३० मीमी
गतवर्षी आजच्या तारखेचा पाणीसाठा – ५८.२७ टक्के





