Reliance Q3 Results: देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजने 11 टक्क्यांच्या वाढीसह 19,641 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ महसूल 3.2 टक्क्यांनी वाढून 248,160 कोटी रुपये झाला आहे.
शुक्रवारी, 19 जानेवारी रोजी तिमाही निकाल जाहीर करताना, रिलायन्सने सांगितले की, तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 248,160 कोटी रुपये होता, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 240,532 कोटी रुपये होता. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 19,641 कोटी रुपये होता जो गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत 17,706 कोटी रुपये होता. तिसर्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 44,678 कोटी रुपये होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 38,286 कोटी रुपये होता, म्हणजेच 16.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल कंपनी रिलायन्स रिटेलच्या किराणा, फॅशन, जीवनशैली आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायातील उत्कृष्ट वाढ पाहता तिसर्या तिमाहीत एकूण महसूल 22.8 टक्क्यांनी वाढून 83,063 कोटी रुपये झाला आहे.
रिलायन्सची दूरसंचार कंपनी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा महसूल तिसऱ्या तिमाहीत 32,510 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 29,195 कोटी रुपये होता. कंपनीचा नफा 5445 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 4881 कोटी रुपये होता.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालांबद्दल, कंपनीचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी म्हणाले, सर्व व्यवसायांमधील संघांच्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळे रिलायन्सने दुसर्या तिमाहीत मजबूत ऑपरेटिंग आणि आर्थिक कामगिरी दर्शविली आहे. जिओ सर्वात वेगवान 5G सेवा आणण्यात यशस्वी ठरले आहे. रिटेल सेगमेंटने चांगले आर्थिक परिणाम दाखवले आहेत. तेल आणि वायू व्यवसायाने आतापर्यंतच्या तिमाहीत सर्वाधिक EBIDTA पोस्ट केले आहे. KG D6 भारताच्या एकूण गॅस उत्पादनात 30 टक्के योगदान देत आहे.