रिलायन्स, एअरटेलचा ईलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’बरोबर सहकार्य करार; ‘शेअर’वर काय झाला परिणाम ?

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एअरटेल या कंपन्यांनी ईलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सबरोबर सहकार्य करार केला. यामुळे या दोन कंपन्यांच्या शेअरच्या भावात सकाळी बरीच वाढ झाली होती. मात्र शेअर बाजारातील एकूण नकारात्मक वातावरण पाहता दुपारनंतर या कंपन्यांना शेअरची ती पातळी कायम ठेवता आली नाही.
बाजार बंद होताना रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर कालच्या तुलनेत 0.74 टक्क्यांनी वाढून 1,256 रुपये 60 पैसे प्रति शेअर पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर एअरटेल कंपनीचा शेअर कालच्या तुलनेत 1.12 टक्क्यांनी कमी होऊन 1,642 रुपये 60 पैसे प्रति शेअर या पातळीवर बंद झाला. या दोन कंपन्या स्पेस एक्सच्या मदतीने दुर्गम भागामध्ये वेगवान इंटरनेट सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहेत. मात्र स्पेस एक्सला अजून भारतात काम करू देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिलेली नाही.
स्पेस एक्सबरोबर सहकार्य केल्यामुळे उपग्रह आधारित स्पेक्ट्रम या दोन कंपन्यांना वापरता येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला माफक दरात मोबाईल आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होतील, असे या दोन्ही कंपन्यांनी सांगितले आहे.
शेअर बाजार निर्देशांकत घट
दरम्यान जागतिक व्यापार युद्धामुळे आणि सलग दुसर्या दिवशी अमेरिकन शेअर बाजार निर्देशांक कोसळल्यामुळे इतर देशांबरोबर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बुधवारी कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 72 अंकांनी कमी होऊन 74,029 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 27 अंकांनी कमी होऊन 22,470 अंकावर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप 0.48 टक्क्याने तर मिड कॅप 0.57 टक्क्यांने कमी झाले. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, संध्याकाळी स्थूल अर्थव्यवस्थेसंदर्भातील आकडेवारी जाहीर होत होणार होती. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार कुंपणावर बसून होते. आज झालेल्या विक्रीचा फटका माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, दूरसंचार, धातू, भांडवली वस्तू, सेवा या क्षेत्रांना बसला.





