Police Company Release Date : राम गोपाल वर्मांच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर! ‘हा’ अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत
Police Company Release Date : या चित्रपटात अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत फरदीन खान, फातिमा सना शेख आणि परेश रावल या कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत.

Police Company Release Date : बॉलिवूडमधील अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारी जगतावर आधारित चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा याच विषयावर चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या आगामी क्राईम ड्रामा चित्रपटाचे नाव ‘पोलीस कंपनी’ असून या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
या चित्रपटात अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत फरदीन खान, फातिमा सना शेख आणि परेश रावल या कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत. ‘पोलीस कंपनी’मध्ये अभिनेता हर्षवर्धन राणे मुंबईतील एक प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी दया नायक यांची भूमिका साकारणार आहे.
‘पोलीस कंपनी’ची कथा काय असेल?
‘पोलीस कंपनी’ची कथा सत्य घटना आणि वास्तविक पात्रांवर आधारित आहे. या चित्रपटात सुमारे ३०० गुंडांच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचे चित्रण दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा मुंबई अंडरवर्ल्ड आणि त्याविरुद्ध पोलिसांच्या कारवाईभोवती फिरणारी आहे.
‘पोलीस कंपनी’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा करत असून, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि राम गोपाल वर्मा यांनी निर्मिती केली आहे. गुलशन कुमार आणि टी-सिरीजच्या बॅनरखाली सादर होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती टी-सिरीज फिल्म्स आणि आरजीव्ही कंपनी करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचे पोस्टर केले शेअर
२० ऑक्टोबर रोजी राम गोपाल वर्मा यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख शेअर केली. यापूर्वी राम गोपाल वर्मा यांनी ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्डची कथा चित्रित केली आहे. यावेळी त्यांचा चित्रपट गुन्हेगारांऐवजी गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणारा चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.





