Relationship Tips : नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढवायचा असेल तर दररोज ‘ही’ गोष्ट नक्की करा; फुलेल प्रेमाचा बहर
दिवसभरातील कामाचा ताण, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि गैरसमज यांमध्ये अनेक जोडपी एकत्र असूनही एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या दूर जातात.

Relationship Tips : अनेकदा नात्यात प्रेम कमी झाल्यामुळे दुरावा निर्माण होत नाही, तर एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद न झाल्यामुळे नात्यात कटुता वाढू लागते. दिवसभरातील कामाचा ताण, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि गैरसमज यांमध्ये अनेक जोडपी एकत्र असूनही एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या दूर जातात.
एकाच घरात राहूनही मनात नेमकं काय सुरू आहे, याची कल्पना एकमेकांना नसते. हळूहळू संवाद कमी होतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागतात. नातं टिकवण्यासाठी केवळ एकमेकांसोबत वेळ घालवणं पुरेसं नसतं, तर त्या वेळेत मनापासून संवाद साधणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
आपल्या जोडीदाराच्या भावना, अपेक्षा, आवडीनिवडी आणि मनातील चिंता समजून घेण्यासाठी संवाद हा सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही नात्यातील भावनिक जवळीक, परस्पर विश्वास आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी यांना विशेष महत्त्व आहे.
तुम्हालाही तुमच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जवळीक अधिक घट्ट करायची असेल, तर रोजच्या धावपळीतून काही मिनिटे एकमेकांसाठी नक्की काढा. जोडीदाराला काही प्रश्न विचारा. हे प्रश्न साधे असले तरी त्यातून मनात दडलेल्या भावना व्यक्त होण्यास आणि नात्यातील संवाद अधिक खुला होण्यास मदत होऊ शकते.
१. आज तुमचा दिवस कसा होता?
दिवसभराच्या धावपळीनंतर घरी आल्यानंतर जोडीदाराला विचारलेला हा साधा प्रश्न नात्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. अनेकदा आपण स्वतःच्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त असतो की जोडीदाराच्या दिवसात काय घडलं, त्यांना कोणत्या अडचणी आल्या किंवा त्यांनी कोणते अनुभव घेतले, हे विचारायलाही विसरतो.
मात्र, ‘आज तुमचा दिवस कसा होता?’ असा प्रश्न विचारल्याने जोडीदाराला आपण त्यांच्या आयुष्याला आणि भावनांना महत्त्व देतो, याची जाणीव होते. त्यांच्या उत्तराकडे लक्षपूर्वक ऐका. मध्येच अडवू नका किंवा लगेच स्वतःचे अनुभव सांगण्याची घाई करू नका. कधी कधी केवळ शांतपणे ऐकून घेणंही नात्यातील जवळीक वाढवण्यासाठी पुरेसं ठरतं.
२. आज तुम्हाला सर्वात जास्त आनंद कशामुळे झाला?
नात्यामध्ये केवळ समस्या आणि तक्रारींवर चर्चा होणं आवश्यक नाही. एकमेकांच्या आनंदात सहभागी होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जोडीदाराला दिवसभरात घडलेल्या आनंददायी गोष्टींबद्दल आवर्जून विचारा.
एखादं कौतुक, मित्रांसोबत घालवलेला वेळ, कामातील यश किंवा एखादी छोटीशी इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांना आनंद मिळाला असेल. अशा गोष्टी जाणून घेतल्याने जोडीदाराला नेमकं कशातून आनंद मिळतो, हे समजण्यास मदत होते.
३. सध्या तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे का?
प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील चिंता किंवा दुःख सहजपणे व्यक्त करू शकत नाही. काही जण जोडीदाराला त्रास नको म्हणून आपल्या समस्या मनातच ठेवतात, तर काही जण गैरसमज होण्याच्या भीतीने बोलणं टाळतात. अशा वेळी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
जोडीदाराला सध्या कोणत्या गोष्टीचा ताण आहे का, कामाचा दबाव आहे का किंवा एखादी गोष्ट मनाला लागली आहे का, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांनी काही सांगितल्यास त्यांची चूक काढण्याऐवजी किंवा लगेच सल्ले देण्याऐवजी आधी त्यांचं म्हणणं समजून घ्या. त्यांना भावनिक आधार द्या.
४. मी तुमच्यासाठी आणखी काय चांगलं करू शकतो किंवा शकते?
प्रत्येक व्यक्तीच्या नात्याकडून काही अपेक्षा असतात. मात्र, त्या अपेक्षा जोडीदाराला नेहमीच समजतात असं नाही. त्यामुळे हा प्रश्न विचारल्याने एकमेकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेण्याची संधी मिळते.
कदाचित जोडीदाराला तुमच्यासोबत अधिक वेळ घालवायचा असेल, घरातील जबाबदाऱ्यांमध्ये मदत हवी असेल किंवा कठीण प्रसंगी तुमचा भावनिक आधार हवा असेल. अशा गोष्टी स्पष्टपणे समोर आल्यास नात्यातील गैरसमज कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यांच्या उत्तराकडे टीका म्हणून न पाहता स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची संधी म्हणून पाहा.
५. आपल्या नात्यात अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्हाला आणखी चांगली व्हावी असं वाटतं?
नातं कितीही जुनं असलं तरी त्यात सुधारणा करण्यासाठी नेहमीच वाव असतो. काळानुसार माणसांच्या अपेक्षा, विचार आणि प्राधान्यक्रम बदलत असतात. त्यामुळे आपल्या नात्याबद्दल जोडीदाराला नेमकं काय वाटतं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
तुमच्यातील संवाद, एकमेकांसाठी दिला जाणारा वेळ, विश्वास, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत किंवा एकत्र घालवलेले क्षण यांपैकी कोणत्या गोष्टीत बदल व्हावा असं त्यांना वाटतं, हे विचारा. या चर्चेत एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी दोघांनी मिळून नातं अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करा.











