Relationship Advice : लग्न ठरलंय.? आपल्या होणाऱ्या लाइफ पार्टनरला ‘या’ गोष्टी नक्की सांगा…; अन्यथा होईल मोठी अडचण
कारण लग्न हा केवळ दोन व्यक्तींचा सोहळा नसतो, तर दोन वेगवेगळ्या स्वभावांची, सवयींची, विचारांची, कुटुंबांची आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांची सांगड असते.

Relationship Advice : लग्न ठरलं की घरात लगबग सुरू होते… कपड्यांची खरेदी, दागिने, हॉल, पाहुण्यांची यादी आणि लग्नाच्या तयारीत सगळेच व्यस्त होतात. पण या सगळ्या गडबडीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र अनेकदा दुर्लक्षित केली जाते.
ते म्हणजे लग्नानंतरचं आयुष्य.! कारण लग्न हा केवळ दोन व्यक्तींचा सोहळा नसतो, तर दोन वेगवेगळ्या स्वभावांची, सवयींची, विचारांची, कुटुंबांची आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांची सांगड असते.
प्रेम, आकर्षण आणि भावनिक जवळीक महत्त्वाची असली, तरी सुखी संसारासाठी काही व्यावहारिक मुद्द्यांवरही लग्नाआधी स्पष्ट चर्चा होणं तितकंच गरजेचं आहे. ‘आपण एकमेकांवर प्रेम करतो, त्यामुळे बाकी सगळं आपोआप ठीक होईल’, असं अनेक जोडप्यांना वाटतं.
मात्र लग्नानंतर पैशांचा वापर, कुटुंबीयांशी असलेली जबाबदारी, मुलांचं संगोपन, करिअर, राहण्याचं ठिकाण आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या विषयांवर मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लग्नाआधीच एकमेकांच्या अपेक्षा, स्वप्नं आणि मर्यादा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
रिलेशनशिप कोच आणि आंतरराष्ट्रीय मीडिया तज्ज्ञ किम्बर्ली मॉफिट यांनीही लग्नाआधी जोडप्यांनी काही महत्त्वाच्या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करावी, असा सल्ला दिला आहे. ते कोणते आहेत हे आपण पाहुयात…
१. पैशांचा व्यवहार कसा असेल?
लग्नानंतर अनेकदा वादाचं एक मोठं कारण पैसा ठरतो. त्यामुळे लग्नाआधीच आर्थिक नियोजनाबाबत स्पष्ट चर्चा करणं महत्त्वाचं आहे. घरखर्च कोणत्या पद्धतीने केला जाणार? सर्व खर्च ५०-५० वाटून घेतला जाणार की दोघांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात जबाबदारी ठरवली जाणार? बचत कशी केली जाणार?
कर्ज असल्यास त्याची परतफेड कशी होणार? संयुक्त बँक खाते असेल की दोघांची स्वतंत्र खाती असतील? मोठ्या खर्चाचे निर्णय एकत्र घेतले जातील का? या प्रश्नांची उत्तरं लग्नाआधीच स्पष्ट असतील, तर भविष्यात पैशांवरून होणारे गैरसमज आणि वाद कमी होण्यास मदत होऊ शकते.
२. दोन्ही कुटुंबांबद्दलच्या अपेक्षा काय आहेत?
प्रत्येक व्यक्तीचं संगोपन वेगळ्या वातावरणात झालेलं असतं. त्यामुळे कुटुंब, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा असू शकतो.
लग्नानंतर आई-वडिलांची जबाबदारी कोण घेणार? दोन्ही कुटुंबांना किती वेळ द्यायचा? सण-समारंभ कुठे साजरे करायचे? कुटुंबीयांच्या निर्णयांमध्ये जोडीदाराची भूमिका काय असेल? या मुद्द्यांवर लग्नाआधीच मोकळेपणाने चर्चा करणं गरजेचं आहे.
जोडीदाराकडून किंवा त्याच्या कुटुंबाकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा पुढे जाऊन तणावाचं कारण बनू शकतात. त्यामुळे अपेक्षा मनात ठेवण्यापेक्षा त्या स्पष्टपणे बोलून दाखवणं अधिक चांगलं.
हे नक्की वाचा : Relationships : पुरूषांच्या ‘या’ खास गोष्टी महिलांना प्रचंड आवडतात; एका भेटीत चुंबकासारख्या आकर्षित होतात, कोण आहेत लकी पुरूष?
३. विचार आणि मतभेद स्वीकारण्याची तयारी आहे का?
राजकीय विचार, धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्टिकोन, जीवनशैली, सामाजिक मुद्द्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्व बाबतीत दोघांचे विचार समान असतीलच असं नाही.
मतभेद असणं चुकीचं नाही; मात्र त्या मतभेदांचा आदर करता येतो का, हे महत्त्वाचं आहे. विशेषतः भविष्यात मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण, आरोग्य आणि जीवनशैली याबाबत दोघांचे विचार वेगळे असतील, तर त्यावर आधीच चर्चा करणं आवश्यक आहे. समान विचारांपेक्षा मतभेद असतानाही एकमेकांचा आदर करण्याची क्षमता नात्यासाठी अधिक महत्त्वाची ठरू शकते.
४. ‘या’ गोष्टी तुम्ही कधीही स्वीकारणार नाही?
प्रत्येक व्यक्तीच्या काही वैयक्तिक मर्यादा आणि ठाम भूमिका असतात. काही गोष्टी अशा असतात ज्या व्यक्तीला अजिबात स्वीकारता येत नाहीत.
उदाहरणार्थ, पाळीव प्राणी पाळणे, शहर बदलणे, नोकरी सोडणे, परदेशात स्थायिक होणे, वेगळ्या घरात राहणे किंवा काही वैयक्तिक सवयी या विषयांवर दोघांची मतं वेगळी असू शकतात.
त्यामुळे “मला हे कधीच मान्य होणार नाही” अशा काही गोष्टी असतील, तर त्या लग्नाआधीच स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. मनातल्या गोष्टी लपवून लग्न केल्यानंतर त्या अचानक समोर आल्यास नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
५. तुमची स्वप्नं आणि भविष्यातील ध्येय काय आहेत?
लग्नानंतरचं आयुष्य केवळ आजपुरतं मर्यादित नसतं. त्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला करिअरमध्ये कुठे पोहोचायचं आहे?
पुढील एक वर्षात किंवा पाच वर्षांत स्वतःला कुठे पाहता? स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे का? परदेशात जाण्याचं स्वप्न आहे का? निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं असावं असं वाटतं?
या सगळ्या गोष्टींवर चर्चा केल्याने दोघांना एकमेकांच्या आकांक्षा समजून घेता येतात. यामुळे भविष्यातील निर्णय घेताना एकमेकांना साथ देणं अधिक सोपं होतं.
लग्नाआधी संवाद हाच सुखी संसाराचा पाया :
लग्नाआधी प्रत्येक गोष्टीवर शंभर टक्के सहमती असणं आवश्यक नाही. दोन व्यक्तींचे विचार वेगळे असू शकतात, त्यांच्या सवयी वेगळ्या असू शकतात आणि त्यांच्या अपेक्षाही वेगळ्या असू शकतात. मात्र या फरकांवर मोकळेपणाने चर्चा करण्याची आणि एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याची तयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
कारण लग्नाआधी झालेले स्पष्ट संवाद अनेकदा लग्नानंतरचे मोठे वाद टाळू शकतात. त्यामुळे लग्नाची तयारी करताना केवळ बाह्य सोहळ्याची तयारी करू नका; तर एकत्र आयुष्य जगण्यासाठी मनाची आणि विचारांचीही तयारी करा.







