Rekha Jare murder case | संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील ( Rekha Jare murder case ) मुख्य संशयित सूत्रधार आरोपी बाळ बोठे ( bal bothe ) याचा अटकपूर्व जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. त्या अर्जावर काल मंगळवारी (दि.15) दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. तथापि, काल न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची रात्री आठच्या सुमारास गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ( Rekha Jare murder case ) त्यात प्रथम तीन व नंतर दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलीस पथकास यश मिळाले. त्यातील आरोपी सागर भिंगारदिवे जेरबंद झाल्यानंतर त्याच्याकडील चौकशीत मुख्य सूत्रधार बाळ बोठे ( bal bothe ) याचे नाव उघड झाले होते. तेव्हापासून पसार असलेल्या बोठे याच्यावतीने 7 डिसेंबरला नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.
बोठे याच्यावतीने ऍड. महेश तवले यांनी न्यायालयात बाजू मांडली. बोठे हे पत्रकार म्हणून काम करीत आहेत. त्यांनी हनी ट्रॅप नावाने वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. त्या वृत्तमालिकेत सागर भिंगारदिवे याचा नामोल्लेख होता. भिंगारदिवे हाच हनी ट्रॅप चालवत असल्याचे बोठे यांनी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे त्या रागातून सागर भिंगारदिवे याने बोठे यांचे नाव घेतले असल्याचा युक्तिवाद ऍड. महेश तवले यांनी काल न्यायालयासमोर केला होता.
दरम्यान, सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली होती. हनी ट्रॅपबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच हनी ट्रॅपबाबत पोलिसांनीही कोणतीही चौकशी केलेली नाही. त्यामुळे या हत्याकांडाचा आणि हनी ट्रॅपचा कोणताही संबंध नाही. तसेच सागर भिंगारदिवे याने त्या रागातून जर बोठे याचे नाव घेतले असेल, तर मग त्या दोघांमध्ये अनेकदा फोन कॉल कसे झाले? त्या दोघांमध्ये बैठका कशा झाल्या? दोघांचे कॉल डिटेल्स आणि हत्याकांडाचा घटनाक्रम जुळतो कसा? असा युक्तिवाद केला होता.
दरम्यान, पोलीस तपासात रेखा जरे यांच्या घरातून पोलिसांना चार पानी पत्र मिळाले आहे. त्यातही जरे यांनी बोठे याचा नामोल्लेख केलेला आहे. त्याच्यापासून जीविताला धोका असल्याचे व त्याच्याकडून छळ होत असल्याच्या नोंदी असल्याची माहिती ऍड. पाटील यांनी न्यायालयास दिली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण घेतला.
मात्र, अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज निकाल दिला. आता बोठे याच्यावतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली जाऊ शकते, असे मानले जात आहे.




