Rekha Gupta : सीजेपी ही आपची बी-टीम; रेखा गुप्ता यांचा आरोप
कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ही आम आदमी पार्टीची बी-टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी बुधवारी केला.

Rekha Gupta : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ही आम आदमी पार्टीची बी-टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी बुधवारी केला. तसेच, पंजाबमध्ये अंमली पदार्थविरोधी कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आंदोलन करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी संघटनेला दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना गुप्ता यांनी सीजेपी विरोधी पक्षांना सोयीस्कर असलेल्या मुद्द्यांवरच आंदोलन करत असल्याचा आरोप केला. पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते परविंदर सिंग ऊर्फ झोटा यांची १३ ऑक्टोबर रोजी मानसा जिल्ह्यातील बाजारपेठेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेवरून त्यांनी (Rekha Gupta) सीजेपीला पंजाबमध्ये आंदोलन करण्याचे आव्हान दिले.
ते आपच्या बी-टीमसारखे का वागतात आणि केवळ त्या पक्षाला सोयीस्कर असलेल्या मुद्द्यांवरच का काम करतात? असा सवाल गुप्ता यांनी केला. जंतर-मंतर येथे अधिकृत निदर्शनांना परवानगी नसतानाही सीजेपी नेत्यांनी बॅरिकेड्स तोडून परिसरात प्रवेश केल्याबद्दल त्यांनी टीका केली.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनातील (एसआयआर) कथित अनियमिततांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत या नेत्यांनी घोषणाबाजी केली होती.
एसआयआर प्रक्रियेला विरोध केल्याबद्दल गुप्ता यांनी काँग्रेस आणि आपवरही निशाणा साधला. या पक्षांनी निवडणुका जिंकलेल्या राज्यांमध्ये मात्र या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात नसल्याचे त्या म्हणाल्या. विरोधकांवर परकीय घटकांशी हातमिळवणी करून देशाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलनांमुळे दिल्लीतील व्यापारी आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे गुप्ता (Rekha Gupta) यांनी नमूद केले.






