Pune : पुन्हा अवतरले बालगंधर्व युग…

पुणे : मराठी संगीत नाटकांना पुन्हा एकदा वैभवाचा काळ प्राप्त झाला पाहिजे, या भूमिकेतून बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे “संगीत स्वयंवर’ नाटकाच्या वैभवी थाटातील शुभारंभाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
नटसम्राट बालगंधर्व ज्या वैभवी थाटात संगीत नाटकांचे प्रयोग करत असत, त्याच पद्धतीने भरजरी वस्त्रे, सोन्याचे खरे अलंकार आणि बालगंधर्व त्या काळात पॅरिसहून जे अत्तर मागवत असत त्या उंची अत्तराचा वापर करून कलाद्वयी निर्मित हा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला पुणेकर प्रेक्षकांनी भरजरी साड्या, झब्बे कुडते आणि पुणेरी पगडी अशा पारंपारिक वेशभूषेत उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नाटकातील कलाकारांनीही साहजिकच तसाच थाट केला होता. भरजरी शालू अन् शेला परिधान केलेली आणि अस्सल ८० तोळे सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली रूख्मिणी प्रेक्षकांना पहायला मिळाली. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांचे स्वागताला सोनचाफ्याची फुले देण्यात आली होती. या “संगीत स्वयंवर’ नाटकाचा शुभारंभ रूई युनिव्हर्सलचे सीईओ नकुल देशपांडे, कोहिनूर उद्योग समूहाचे प्रमुख कृष्णकुमार गोयल, सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी आणि उद्योजक श्रीधर प्रभू यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध संगीत रंगकर्मी गायक-नट सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी आणि पराग कुलकर्णी उपस्थित होते.
या प्रयोगानिमित्त बालगंधर्वांच्या कन्या सरोजिनी वाभळे यांची मुलगी म्हणजेच बालगंधर्वांची नात ज्योत्स्ना बडवे तसेच अनुराधा राजहंस आणि श्रीपाद राजहंस या बालगंधर्वांच्या वंशजांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.रूख्मिणीची भूमिका प्रसिद्ध गायक-अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांनी साकारली. यामध्ये चिन्मय जोगळेकर, वर्षा जोगळेकर, सुदीप सबनीस, अवंती बायस, संजय गोसावी, विजय कुलकर्णी, निरंजन कुलकर्णी यांनी भूमिका केल्या. त्यांना ऑर्गनवर संजय गोगटे आणि तबल्यावर विद्यानंद देशपांडे यांनी साथसंगत केली.
बालगंधर्वांच्या काळात गंधर्व नाटक मंडळीमध्ये पुरणपोळीचे जेवण केले जात असे. त्याचे स्मरण म्हणून प्रेक्षकांनी प्रयोगानंतर किशोर सरपोतदार यांच्या पूना गेस्ट येथे पुरणपोळीचा आस्वाद घेतला.





