पुणे | मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी पुनर्वसन गृह

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वयंसेवी संस्थांमार्फत मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी पुनर्वसन गृहे स्थापन करण्याचा निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने घेतला आहे. त्यानुसार तीन स्वयंसेवी संस्थांची निवड झाली आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थामार्फत प्रस्ताव मागविण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त झालेले एकूण ३० प्रस्ताव दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. ते आयुक्त यांनी शासनास सादर केले आणि त्या प्रस्तावांमधून मानसिक आजारमुक्त व्यक्तींसाठी पुनर्वसन गृहांची निवड झाली आहे.
पुणे, नागपूर, ठाणे येथील संस्थांची निवड झाली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील शांतीबन वृद्धाश्रम किंवा केअर सेंटर, ठाणे येथील कमलनी निलमणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उज्ज्वल वेलनेस सेंटर, नागपूरमधील मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड एक्शन या संस्थांची निवड झाली आहे.
शासन निर्णयानुसार मुदतीत उपक्रम चालू करणे संबंधित संस्थेवर बंधनकारक राहील. उपक्रम मुदतीत सुरू न केल्यास संबंधित संस्थेची निवड कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय रद्द करण्यात येईल.
त्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकावर असलेल्या संस्थेस गुणानुक्रमे संबंधित पुनर्वसन गृह चालविण्यास देण्याची कार्यवाही करण्यात येईल. संस्थेची निवड झाल्यानंतर संस्था व शासनामध्ये पुनर्वसन गृहाच्या कामकाजाबाबत सामंजस्य करार करण्यात येईल.




