पिंपरी | १३३७ सदनिकांसाठी दोन हजार लाभार्थ्यांची नोंदणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ येथील आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथील सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेअंतर्गत शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
त्याला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून २४ ऑक्टोबरपर्यंत जवळपास दोन हजार नागरिकांनी प्राथमिक नोंदणी संकेतस्थळावर केली आहे, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.
पीएमआरडीएअतंर्गत पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत (ईडब्लूएस) (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व कमी उत्पन्न गट (एलआयजी) (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका तसेच पेठ क्रमांक ३०-३२ येथील आर्थिक दृष्ट्या कमकुवत (ईडब्लूएस) (१ आरके) प्रवर्गात ३४७ सदनिका तसेच कमी उत्पन्न गट (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
त्यासाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यात १२ ते २५ ऑक्टोबर २०२४ दुपारी चारपर्यंत १ हजार ९३२ जणांनी संकेतस्थळावर नोंदणी केली. यात २९९ नागरिकांनी परिपूर्ण अर्ज भरले असून २१८ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे.
त्यांचे परिपूर्ण अर्ज पीएमआरडीएला प्राप्त झाले आहे. उर्वरित अर्ज कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी अर्जदारांकडून पुर्णपणे भरलेले नाहीत. परंतु, त्यांची प्राथमिक नोंदणी झाली आहे, असे पीएमआरडीएकडून कळविण्यात आले.
१२ नोव्हेबरपर्यंत मुदत
इच्छुकांना पीएमआरडीएअंतर्गत असलेल्या सदनिकांसाठी १२ नोव्हेबर २०२४ पर्यंत अर्ज करता येतील. पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमकुवत (ईडब्लूएस) (१ बीएचके) प्रवर्गातील २९.५५ चौ. मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत १५ लाख ७४ हजार ४२४ इतकी आहे. कमी उत्पन्न गट (एलआयजी) (२ बीएचके) प्रवर्गातील ५९.२७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत ३५ लाख ५७ हजार २०० आहे.
तर, पेठ क्रमांक ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गातील २५.५२ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत २० लाख ९० हजार ७७१ आहे. तर, कमी उत्पन्न गट (एलआयजी) (१ बीएचके) प्रवर्गातील ३४.५७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत २८ लाख ३२ हजार २०८ आहे.
या गृहप्रकल्पातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील सदनिकांसाठी ५००० अनामत रक्कम असून कमी उत्पन्न गट (एलआयजी) प्रवर्गातील सदनिकांसाठी १० हजार अनामत रक्कम आहे. तसेच, दोन्ही प्रवर्गासाठी जीएसटीसह फॉर्म फी ७०८ रुपये लागणार आहे.
पीएमआरडीएअतंर्गत काढण्यात आलेल्या सदनिकेच्या लॉटरीसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. यात गत १३ दिवसात (२४ ऑक्टोबरपर्यंत) एक हजार ९३२ नागरिकांनी प्राथमिक नोंदणी केली. यात आधार, पॅन, डोमेसाईल, उत्पन व जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येत आहे.
यासह शासनाच्या नियमानुसार २०१८ नंतरचे डोमेसाईल तसेच जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या सदनिकांसाठी नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करावेत. – डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए





