Nagar | राहुरीत ३३ हजार नवमतदारांची नोंदणी

राहुरी, (प्रतिनिधी): विधानसभेचा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी १ लाख ६६ हजार ७६२ पुरूष तर १ लाख ५४ हजार ३२५ तर इतर १ असे एकूण ३ लाख २१ हजार ८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
मतदार यादीमध्ये मागील विधानसभेपेक्षा यंदा ३३ हजार अधिक नव मतदार नोंदणी झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा राहुरी निवडणूक निर्णयाधिकारी शाहुराज मोरे यांनी दिली.
राज्यात विधानसभेचा बिगूल वाजल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघातील पेटलेल्या राजकीय वणव्यात अनेक इच्छुकांनी मुंबई येथील मंत्रालय गाठण्याच्या उद्देशाने यंत्रणा उभारणी सुरू केली आहे.
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राहुरी विधानसभेची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपजिल्हाधिकारी तथा विधानसभा निवडणूक प्रमुख मोरे, तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी विधानसभा आचारसंहिता व मतदार संघातील नियोजनाची माहिती दिली.
उपजिल्हाधिकारी मोरे यांनी सांगितले की, मागील २०१९ च्या निवडणुकीवेळी पुरूष मतदार १ लाख, ५७ हजार ७०९ इतके होते तर महिला मतदार १ लक्ष ३६ हजार ४१६ इतक्या होत्या. त्यामध्ये वाढ होऊन यंदाच्या विधानसभेला मतदार यादीनुसार ३३ हजार नवमतदार वाढले आहे. यंदा एकूण ३ लाख २१ हजार ८८ मतदार मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.
राहुरी मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीच्या रेकॉर्डनुसार एकही संवेदनशिल मतदान केंद्र नसले तरीही चोख बंदोबस्त तसेच उचित नियोजन व्यवस्था राखली जाणार आहे. राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३०७ मतदान केंद्र आहे.
बुर्हाणनगर येथील एका मतदान केंद्रामध्ये १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार असल्याने तेथे उपमतदान केंद्र अधिक असणार आहे. राहुरी येथील जुने सेतू कार्यालयामध्ये अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया केली जाणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणार्या एकूण १ हजार ७१० कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर ५ कर्मचारी असे १ हजार ५४० कर्मचारी कार्यरत तर राखीव कर्मचारी १७० राहणार आहे. मतदान केंद्रासाठी नेमणूक असलेल्या कर्मचार्यांना टपाली मतदान करण्यासाठी प्रशिक्षण ठिकाणावरच मतदान सुलभता केंद्र देण्यात येणार आहे.
ज्या मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्र कमी झाले आहे, तेथे मतदानाचा आकडा वाढविण्यासाठी मतदान केंद्राची सजावट तसेच इतर उपक्रम राबविले जाणार आहे.

