मुंबई : भिवंडीतील वळपाडा इमारत दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय सात ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी माधयमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, “वर्धमान कंपाऊंडमध्ये ही दुर्घटना घडली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या इमारतीत सात ते आठ कुटुंबं राहत होती. इमारत पडल्यानंतर महापालिकेचं बचाव पथक, टीडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशामक दल, पोलीस यंत्रणा तात्काळ या ठिकाणी पोहचले. त्यांनी इमारतीखालून १२ लोकांना बाहेर काढलं. त्यातील सुदैवाने ९ लोक जीवंत बाहेर निघाली, दुर्दैवाने चार लोकांचा मृत्यू झाला.” असे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच “या इमारतीखाली आणखी सात ते आठ लोकं असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मदतकार्य सुरू आहे. इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत मी जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. आगामी पावसाळा लक्षात घेता अगदी केव्हाही पडू शकतील अशा धोकादायक इमारतींचं सर्व्हेक्षण करून त्या इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना केल्या आहेत,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. “याशिवाय भिवंडी व इतर शहरांमध्ये पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती पडण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. हे लक्षात घेऊन धोकादायक इमारतींमधील लोकांना सुरक्षित हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास हाच त्यावरील कायमस्वरुपीचा तोडगा आहे. म्हणून मी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना तातडीने क्लस्टरच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत,” असेही एकनाथ शिंदेंनी नमूद केले.