परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रम नव्याने निश्चित करा; कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली : अमेरिकेकडून एफ-१६ विमानांच्या देखभालीसाठी पाकिस्तानला ३९.७ कोटी डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. त्या घडामोडीवरून कॉंग्रेसने मोदी सरकारला घेरले. त्या पक्षाने सरकारच्या राजनैतिक रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, भारताच्या हितरक्षणासाठी परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रम नव्याने निश्चित करण्याची मागणी केली.
अमेरिकेच्या निर्णयावर कॉंग्रेसचे नेते पवन खेरा यांनी प्रतिक्रिया दिली. अमेरिकेच्या मागील बायडेन प्रशासनाने विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलर्सचे पॅकेज दिले होते. त्याची आठवण आताच्या निर्णयाने करून दिली. त्यातून पाकिस्तानला असणारे अमेरिकेचे लष्करी पाठबळ अधोरेखित होते. पाकिस्तानने संबंधित विमानांचा वापर भारताच्या विरोधात केला. ती बाब विचारात घेता अमेरिकेच्या कृती भारताच्या सुरक्षाहितांशी तडजोड करणाऱ्या आहेत.
केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार असताना भारत आणि अमेरिकेतील संरक्षण आणि व्युहात्मक सहकार्यात लक्षणीय वाढ झाली. यूपीए सरकारने भक्कम राजनैतिक आणि व्युहात्मक पाऊले उचलली. त्यामुळे भारत-अमेरिका संबंध वृद्धिंगत झाले. भारताच्या संरक्षण क्षमतांमध्ये आणि जागतिक प्रभावात वाढ झाली. ऐतिहासिकदृष्ट्या कॉंग्रेसने समतोल आणि सक्रिय परराष्ट्र धोरण अवलंबले, असे त्यांनी म्हटले.

