लाल वादळ लोणीच्या दिशेने रवाना

अकोले – शेतकरी हा कधी स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढा देत राहतो. लोकांना वाचविण्याचे देशात संविधान टिकवण्याचे काम करतो. देशात कार्पोरेट क्षेत्र व अदानी, अंबाणीचा धोका सर्वात प्रथम शेतकऱ्यांनीच ओळखला असल्याचे सांगत सध्या देशात मोठे कृषि संकट असून त्यासाठी हा लढा आहे. या लाल वादळापुढे सरकारला झुकावेच लागेल, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी व्यक्त केला.
भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी, कष्टकरी, आदिवासी लोकांचे प्रश्नांसंदर्भात अकोले ते लोणी महसूलमंत्री यांच्या घरापर्यत पायी मोर्चाला प्रारंभ आज अकोलेतील बाजारतळावर पी. साईनाथ यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी कॉ.अशोक ढवळे, अर्थतज्ज्ञ डॉ. राम कुमार, डॉ. उदय नाडकर, कॉ. मरीअम ढवळे, मध्यप्रदेश किसान नेते बादल सरोज, डहाणुचे आमदार विनोद निकोले, जी.पी.गावीत, अजय कुरांडे, डॉ. अजित नवले, कॉ. किसन गुजर, चंद्रकांत गोरठाणा, संतोष वाडेकर, विजय पाटील, अण्णा शिंदे आदि उपस्थित होते. अकोले शहरातून घोषणा देत पुढे गेला. या पायी मोर्चात अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे महात्मा फुले चौकातून सामील होऊन 1 किलोमीटर पायी चालत या मोर्चाला पाठिंबा दिला.
साईनाथ म्हणाले की देशात व राज्यात मोठे कृषि संकट आलेले आहे. याकडे सरकारचे लक्ष नाही. शेतकरी हा समाजासाठी नेहमी लढा देत आला आहे. मागेही शेतकऱ्यांनी 142 किमी पायी चालत नाशिक ते मुंबई मोर्चा नेला होता. शेतकऱ्याने पहिल्यादां कार्पोरेट क्षेत्राचा, अदानी अंबानीचा धोका ओळखला होता. आजपर्यत मिडियाने अंबानीची किती संपत्ती आहे हे दाखवले आहे का? याविरूद्धही शेतकरीच लढा देणार आसल्याचे सांगितले. डॉ. उदय नाडकर म्हणाले, या सरकारने आपले प्रश्न सोडवण्याची इच्छा दिसत नसल्याने मोर्चा काढावा लागल्याचा निर्धार केला आहे. या खोके सरकारची लक्तरे वेशीवर टांगली असल्याचे देशाने पाहिले आहे.
28 ला मोर्चा मंत्री विखेंच्या कार्यालयावर
भारतीय किसान सभेचा अकोलेतून निघालेल्या या पायी मोर्चात राज्यभरातून हजारो आंदोलक सहभागी झाले होते. अतिशय शिस्तबंध्द निघालेले हे लाल वादळ आज रात्री धांदरफळ बु येथील रामेश्वर देवस्थान येथे मुक्कामी राहिल व सकाळी 7 वा मार्गस्थ होऊन दुपारी खतोडे लॉन्स संगमनेर येथे आराम करुन उद्या रात्री वडगावपानला मुक्काम करेल व परवा 28 तारखेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लोणी येथील कार्यालयावर धडकेल.





