पुणे | सिग्नल दुरूस्तीलाच ‘रेड सिग्नल’

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील वाहतूक कोंडीने पुणेकरांचा श्वास गुदमरलेला असतानाच शहरातील वाहतुकीच्या नियंत्रणात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या शहरातील सिग्नलच्या (वाहतूक नियंत्रक दिवे) देखभाल दुरूस्तीसाठी महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पावसाळ्यात शहरातील वेगवेगळ्या चौकातील सिग्नल बंद पडल्यास निधी अभावी त्याची दुरूस्तीच होणार नसल्याचे लक्षात येताच हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने धावपळ सुरू केली आहे. त्यासाठी विद्युत विभागाकडून अंदाजपत्रकात वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात येणार आहे.
शहरातील रस्ते अरूंद असल्याने तसेच रस्त्यांवर अतिक्रमणे असल्याने शहरात सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी सिग्नल यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरातील रस्त्यावर चौक तसेच वर्दळीच्या रस्त्यावर सुमारे २५० ठिकाणी सिग्नल उभारण्या आले आहेत. त्यातील १२५ सिग्नल स्मार्ट सिटी अंतर्गत असून त्याची देखभाल दुरूस्ती पुढील पाच वर्षे स्मार्ट सिटी करणार आहे. तर उर्वरीत सिग्नलची देखभाल दुरूस्ती महापालिकेची जबाबदारी आहे.
स्मार्ट सिटी वगळता उर्वरीत सिग्नलच्या दुरूस्तीचा आणि मनुष्यबळाचा सगळा खर्च महापालिका करते. यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात दोन ते अडीच कोटींची तरतूद केली जाते. दोन वेगवेगळ्या निविदा काढून हे काम केले जाते. पुणे शहरात नव्याने सिग्नल यंत्रणा उभारणे आणि जुने सिग्नल दुरुस्त करणे, यासाठी तरतूद केली जाते. मात्र, या वर्षीच्या अंदाजपत्रकात यासाठी निधीच नाही.
सिग्नल दुरुस्तीसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद नाही, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तत्काळ महापालिका आयुक्तांना तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले आहे. निधी मंजूर झाल्यानंतर सिग्नल संदर्भातील कामात कोणतीही अडचण येणार नाही. – श्रीनीवास कंदूल, प्रमुख, विद्युत विभाग
पावसाळ्यात भासते गरज…
पावसाळ्याच्या दिवसांत शहरातील सिग्नल हमखास बिघडतात. पाऊस आणि वाऱ्याने पोल पडतात. कधीकधी दिव्यांची लाइट आपोआप चालू-बंद होते. यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम वाहतूक पोलीस करतात. त्यांच्याकडून तक्रार आल्यानंतर दुरुस्ती केली जाते. यासाठी महापालिकेने दोन जीप उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये ड्राइवर, इंजिनियर आणि पोलिसांचा मदतनीस (चार्ली) असतो.





