Indapur : 258 कृषीसेवा उमेदवारांच्या नियुक्तीला वेग
Indapur : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2024 मध्ये कृषी विभागातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी अधिकारी-कनिष्ठ या पदांसाठी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.

इंदापूर : महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा-2024 मधून निवड झालेल्या 258 शिफारसप्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न आता वेगाने मार्गी लागणार आहे. नियुक्तीच्या मागणीसाठी उमेदवारांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत पुढील आठ दिवसांत वैद्यकीय तपासणी आणि पोलीस पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘दैनिक प्रभात’ला दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2024 मध्ये कृषी विभागातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी अधिकारी-कनिष्ठ या पदांसाठी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतून 258 उमेदवारांची निवड झाली असून, त्यांची शिफारस यादी 19 जून 2026 रोजी कृषी विभागाला प्राप्त झाली. त्यानंतर विभागीय कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, 21 जुलै 2026 रोजी सर्व 258 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणीही पूर्ण झाली आहे.
निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती प्रलंबित राहिल्याने उमेदवारांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने कृषिमंत्री भरणे यांची मंत्रालयात भेट घेऊन नियुक्तीबाबत निवेदन दिले. मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकर मार्गी लागणे आवश्यक असल्याचे भरणे यांनी सांगितले. निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी संबंधित विभागाने वेळेत पाठपुरावा करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
उमेदवारांची वैद्यकीय तपासणी आणि पोलीस पडताळणी पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. नियुक्ती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
उमेदवारांनी काळजी करू नये. त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न सकारात्मक पद्धतीने लवकरात लवकर सोडविण्यासाठी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 258 उमेदवारांना या निर्देशामुळे दिलासा मिळाला असून, आता वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.





