पुणे | थकीत वीजबिलांच्या वसुलीला वेग द्यावा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – करोनाच्या महासंकटात, तसेच प्रलयकारी निसर्ग व तौक्ते चक्रीवादळात महावितरणने अविस्मरणीय ग्राहकसेवेचा प्रत्यय दिला आहे. संकटकाळात देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभिमान आहे; परंतु सध्या वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने थकबाकीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती सध्या चिंताजनक आहे.
मात्र, या आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये आहे आणि हे आव्हान स्वीकारून थकीत वीजबिलांच्या वसुलीला वेग द्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले.
सीओईपी तांत्रिक विद्यापीठाच्या सभागृहात लाइनमन दिनानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात प्रादेशिक संचालक नाळे बोलत होते. या वेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रेय बनसोडे, विद्युत निरीक्षक एन. जी. सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, संजीव राठोड, डॉ. जयवंत श्रीखंडे यांची उपस्थिती होती.
करोनाच्या संकटापासून महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक झाली आहे. सध्या थकबाकीमध्ये वाढ होत असल्याने कंपनीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी थकीत वीजबिलांच्या वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. जे थकबाकीदार आहेत, त्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार विनाविलंब खंडित करण्याच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असेही ते म्हणाले.





