Diwali 2026 : दिवाळीपूर्वीच वाहन विक्रीचा उच्चांक
ऑक्टोबरमध्ये २६ हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी

इनुराद विश्वकर्मा
पिंपरी– दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. यंदा मात्र दिवाळीच्या पूर्वीच दसऱ्याला वाहनविक्रीचा उच्चांक झाला आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात दिवाळी होती त्यामुळे सर्वाधिक वाहनविक्री आॅक्टोबर महिन्यात झाली होती.
यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात आहे परंतु दिवाळीपूर्वीच आॅक्टोबर महिन्यात सुमारे २६ हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. याचाच अर्थ रोज सरासरी ९०० ते १००० नवी वाहने रस्त्यावर उतरली आहेत.
मार्चनंतर सर्वाधिक विक्री आॅक्टोबर महिन्यात दसरा-दिवाळीमुळे होत असते. यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असताना देखील आॅक्टोबर महिन्यात या वर्षातील विक्रीचा उच्चांक दिसून येत आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील वाहन बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ऑक्टोबर महिन्यात शहरात तब्बल २६ हजार ६४८ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक असून चारचाकी वाहनांनाही ग्राहकांची पसंती मिळाली आहे.
त्यामुळे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात १७ हजार ९६ दुचाकींची नोंदणी झाली. तर चारचाकी वाहनांच्या नोंदणीचा आकडा ७ हजार ३२२ इतका आहे.
याशिवाय २९३ तीनचाकी, १ हजार ८२१ व्यावसायिक वाहने आणि ११६ ट्रॅक्टरची नोंदणी झाली आहे. एकूण नोंदणीमध्ये दुचाकींचा वाटा सर्वाधिक असून चारचाकी वाहनांची नोंदणीही लक्षणीय आहे.
दुचाकींची मागणी कायम
पिंपरी-चिंचवड शहरातील दैनंदिन प्रवासासाठी दुचाकीला नागरिकांची पसंती मिळत आहे. नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी दुचाकी हे प्रवासाचे सोयीस्कर साधन ठरत आहे.
तुलनेने कमी खर्च, इंधन बचत आणि वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याची सुविधा यामुळे दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा कल कायम आहे. ऑक्टोबरमधील १७ हजारांहून अधिक नोंदणीमुळे हे स्पष्ट होते.
चारचाकी खरेदीतही उत्साह
दुचाकींबरोबरच चारचाकी वाहनांच्या नोंदणीनेही लक्ष वेधले आहे. एका महिन्यात ७ हजार ३२२ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली आहे.
कुटुंबाचा प्रवास, सुरक्षितता आणि वैयक्तिक वाहनाची गरज लक्षात घेऊन नागरिकांकडून चारचाकी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. दसरा आणि विजयादशमीसारख्या शुभमुहूर्तावर नवीन वाहन घरी आणण्याची परंपरा असल्याने या काळात वाहन खरेदीला विशेष महत्त्व असते.
व्यावसायिक वाहनांचीही नोंद
शहराचे औद्योगिक आणि व्यावसायिक स्वरूप लक्षात घेता व्यावसायिक वाहनांची नोंदणीही महत्त्वाची ठरते. ऑक्टोबरमध्ये १ हजार ८२१ व्यावसायिक वाहनांची नोंदणी झाली आहे.
मालवाहतूक, उद्योग आणि विविध सेवा क्षेत्रांमध्ये वाहनांची आवश्यकता असल्याने या श्रेणीतील नोंदणीकडेही लक्ष वेधले जाते. तीनचाकी वाहनांची २९३, तर ट्रॅक्टरची ११६ नोंदणी झाली आहे.
साधारणपणे दिवाळीच्या काळात वाहन खरेदीला मोठी चालना मिळते आणि या कालावधीत वाहन नोंदणीचा उच्चांक गाठला जातो. मात्र, यंदा दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्यात ही नोंद झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच वाहन नोंदणीचा मोठा आकडा गाठला गेल्याचे चित्र आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला मिळालेला प्रतिसाद आणि सणासुदीच्या काळातील ग्राहकांचा उत्साह यामुळे यंदा वाहन बाजारात लवकरच तेजी आल्याचे दिसून येते.
Talegaon Dabhade : अवकाळी पावसाचा कापणीस आलेल्या भातपिकाला फटका





