पाडलेले मंदिर 2 आठवड्यात पुन्हा उभारा; पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

इस्लामाबाद – कट्टरवाद्यांनी पाडलेले हिंदू मंदिर दोन आठवड्यांच्या कलावधीत पुन्हा उभारा असे आदेश पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. खैबर पख्तुनवा करक जिल्ह्यात दिनांक 30 डिसेंबरला कट्टरवाद्यांनी हे नूतनीकरण सुरू असलेले मंदिर पाडून जाळून टाकले होते.
मात्र पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने हे मंदिर पुन्हा उभारण्याच्या कामाला त्वरित सुरूवात करण्याचे आणि दोन आठवडयात मंदिर पुन्हा उभारण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच या फेरउभारणीच्या कामाचा खर्च मंदिर पाडणाऱ्या व्यक्तींकडून वसूल करण्याचे आदेशही पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गुलजार अहमद यांनी दिले आहेत.
मंदिर पाडले जाण्यासंदर्भात पाकिस्तानातील मानवी हक्क आयोगाच्या एकसदस्यीय समितीने आपला अहवाल सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मंदिराची जागा बळकावणाऱ्यांकडून ही जागा पुन्हा ताब्यात घेण्यात यावी आणि अया हल्ल्याची सखोल चौकशी सरकारकडून केली जायला हवी, असे या अहवालात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरून मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष शुहैब सुडी यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन घटनेबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर केला.
मंदिराचे नूतनीकरण आणि विस्तारीकरणाला विरोध करणाऱ्या जमैयत उलेमा ए इस्लामी पक्षाच्या (फजलूर ए रेहमान गट) कार्यकर्त्यांच्या जमावाने 30 डिसेंबर रोजी हे मंदिर पाडून पेटवून दिले होते.





