बांधकामांना विहिरी, कूपनलिकेचेच पाणी ! पुणे महापालिकेच्या प्रक्रिया केलेल्या सांडपाणी वापराला अल्प प्रतिसाद मिळण्याचे कारण

पुणे -पिण्याचे पाणी बांधकामांना वापरण्यासाठी महापालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. यासाठी सांडपाणी प्रकल्पातील पाणी वापरण्याच्या सूचना करण्यात आले असून अन्यथा बांधकाम थांबविण्याचा इशाराही देण्यात आला आहे. परंतु, पालिकेत समाविष्ट गावांत सुरू असलेल्या छोट्या-मोठ्या बांधकामांवर सर्रास पिण्याचे विहिरी अथवा कुपनलिकांचे पाणी वापरले जात आहे, अशा ठिकाणी पालिकेच्या यंत्रणेकडून कुठलीही पाहणी अथवा कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे.
शहर तसेच उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा तसेच महापालिकेला उपलब्ध होणारे पाणी यानुसार पाणी पुरवठ्याचे नियोजन करताना बांधकामांना पिण्याचे पाणी वापरावर बंदी घालण्यात आली, याबाबतचे आदेश पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. तसेच, पिण्याचे पाणी वापर होणारी बांधकामे थांबविण्याचा इशाही देण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी टॅंकरद्वारे मागविण्यासाठी विशेष मोबाइल ऍपचीही सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, दोन आठवड्यानंतरही महापालिकेच्या या योजनेला शहर विशेषत: उपनगरांतील बांधकाम व्यावसायिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांत बांधकामे वेगात सुरू आहेत. पलिकेत समावेश झाल्याने या गावांत मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. यामध्ये छोट्या बांधकामांचाही समावेश आहे. समाविष्ट असलेल्या गावांची एकूण संख्या लक्षात अशा ठिकांणी मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. याशिवाय गुंठेवारीतही स्वमालकीची बांधकामे सुरू आहेत, अशा बांधकामांना बहुतांशी करून टॅंकरने पाणी पुरवले जात आहे.
हे पाणी पिण्याचे नसले तरी खासगी विहिरी अथवा कुपनलिकांचे असल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय ज्या ठिकाणी मोठी बांधकाम सुरू आहेत, अशा काही ठिकाणी पूर्वीच खोदलेल्या विहिरी आहेत शिवाय टॅंकरने पाणी मागविण्याचा खर्च लक्षात घेता अनेक बांधकाम व्यावसायिकांनी एक-दोन कुपनलिका खोदून घेतल्या आहेत, याच कुपनलिकांचे पाणी नंतर इमारत पूर्ण झाल्यानंतर सदनिकाधारकांना वापरात येत असल्याने बांधकामासाठी पाण्याची व्यवस्था करताना बांधकाम व्यावसायिकांकडून कुपनलिका खोदण्यावरच अधिक भर असल्याचे दिसते. याच कारणातून महापलिकेच्या इशाऱ्यानंतरही बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी पालिकेकडून टॅंकरने मागवण्याकडे बांधकाम व्यावसायिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
बांधकाम संघटनांना सूचना पत्र…
महापालिकेने धरणातील पाण्याची बचत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असताना शहरात आठ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांतून सुमारे 350 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी नदीत सोडले जाते. हेच पाणी बांधकामासाठी वापरण्याच्या सूचना बांधकाम व्यावसायिकांना करण्यात आल्या आहेत. हे पाणी प्रक्रिया केंद्रातून टॅंकर भरून न्यावे, असे आवाहन पालिकेने करताना ऍप सुविधाही दिली आहे. पालिकेने काही बांधकाम संघटनांना याबाबत सूचना पत्र पाठविले असतानाही त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.
टॅंकरचालकांना मिळणारे भाडे…
बांधकामांना असे प्रक्रिया केलेले सांडपाणी हवे असल्यास त्याची ऍपवर मागणी करावी लागते. नोंद असलेल्या बांधकामधारक तसेच टॅंकरमधून हे पाणी न्यावे लागते. महापालिकेने प्रक्रिया केलेले हे सांडपाणी मोफत उपलब्ध करून दिले आहे. फक्त वाहतुकीचा खर्च बांधकाम व्यावसायिकाला करायचा आहे. परंतु, असे पाणी घेऊन जाण्याच्या फेरीला मिळणार भाडे आणि विहिरीवरील पाणी टॅंकरने भरून नेल्यानंतर टॅंकर चालक-मालकाला मिळणारे भाडे यात मोठा फरक आहे.
शासकीय कामांसाठी कुठले पाणी?
शहरात तसेच उपनगरांत बांधकाम विभागाकडूनही कामे सुरू आहेत. समाविष्ट गावांतही अशी कामे होत आहेत, अशा कामांना उपलब्ध होईल ते पाणी वापरले जात असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांकडूनच सांगण्यात आले. आम्हाला प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरण्याच्या सूचना नसल्याचेही स्पष्ट करण्यात आल्याने सदर आदेश व्यावसायिक बांधकामांसाठी आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.





