पेट्रोलिंगचे रिअल-टाइम मॉनिटरिंग

रेल्वेकडून जीपीएस आधारित पेट्रोलमॅन मॉनिटरिंग सिस्टीम
पुणे – रेल्वेचे संचलन सुरक्षित होण्यासाठी गस्तीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. गस्त अधिक सुरक्षित होण्यासाठी पुणे विभागात जीपीसी आधारित मॉनिटरिंग सिस्टीम कार्यान्वित केली आहे.
रेल्वेच्या सुरक्षित संचलनाची खात्री करण्यासाठी मान्सून गस्त, उष्ण आणि थंड हवामान गस्त, की-मॅन गस्त आदी नियमितपणे करण्यात येते. हे काम जोखमीचे असून, गस्तीवर देखरेख ठेवणे महत्त्वाचे असते. यापूर्वी पर्यवेक्षक किंवा अधिकारी गस्त घालणाऱ्यांची तपासणी करत होते. या पद्धतीने गस्त घालण्याची वेळ, निर्धारित वेळेत गस्त पूर्ण केली का हे जाणून घेण्यात अडचणी येत होत्या.
या अडचणींवर मात करण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी या यंत्रणेची मदत होणार आहे. पुणे विभागाने गस्त घालणाऱ्यांसह विविध कर्मचाऱ्यांना सुमारे 300 जीपीएस उपकरणे दिली आहेत. याद्वारे पेट्रोलिंगचे रिअल-टाइम मॉनिटरिंग मोबाइलमधील ऍप्स, विभागीय सहायक मंडल इंजिनीअर आणि मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कार्यालयात होणार आहे. यासह कर्मचाऱ्यांचे वेळापत्रकासह अधिकाऱ्यांना स्थान आणि “एसओएस अलर्ट’ मिळणार आहे.
अशी आहे यंत्रणा
“क्लाऊड सबस्क्रिप्शन’ आधारे असणाऱ्या सॉफ्टवेअरद्वारे नकाशा दृश्य, अहवाल तयार करणे आदी बाबी करता येतात. इंटरनेट ब्राऊझरद्वारे वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्डद्वारे मॉनिटरिंग केले जाते. बॅटरीची स्थिती, डिव्हाइसेस बंद, कव्हर न केलेले बीट, यशस्वीरित्या पूर्ण केलेल बीट आणि ओवर स्पीडिंग आदीचा समावेश असणारे की-मॅन, पेट्रोलमॅनचा अहवाल याद्वारे तयार करण्यात येतात. यासह डिव्हाइस सिग्नल माहिती, मॉनिटर एसओएस प्रेस, डिव्हाइस बॅटरी स्थिती, अपवाद अहवाल, डिव्हाइस चालू किंवा बंद स्थिती याचा देखील अहवाल दररोज तयार होणार आहे. अनियमितता, स्पष्टीकरण आणि समुपदेशनासाठी गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येणार आहे.





