मुंबईत कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार – आंबेडकर

मुंबई – आम्ही मुंबईच्या पातळीवर एक पर्याय उभा करत आहोत. कॉंग्रेससोबत युती करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना सतत म्हटले होत की, तुम्ही ज्या जागा हरलेल्या आहात त्या आम्हाला द्या अशी मागणी केली आहे, आम्ही कॉंग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीगसोबत आघाडी करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. तीन पक्ष मिळून जानेवारीच्या मध्यापर्यंत जागावाटप जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतचं आणखी काही पक्ष देखील आमच्यासोबत येत आहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार आहोत. उद्या आम्ही प्रचाराला सुरवात करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते घटनाविरोधी आहे. वारंवार कोव्हिडच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे आहे. आणीबाणी जरी घोषित होणार असेल तरी निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत, असे ते म्हणाले.





