रेल्वेच्या समस्यांना बैठकीत फुटली वाचा; सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यासह ‘लोकल’चा मुद्दा

पुणे – मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेसला पुन्हा हिरवा कंदील मिळाला. लवकरच सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. तसेच श्री महालक्ष्मी एक्स्प्रेसचे डबे वाढविणे, ते स्वच्छ आणि सुरक्षित असावे. पुणे-लोणावळा मार्गावर लोकलची संख्या वाढवून ती दौंडपर्यंत चालवावी. मुंबई-कोल्हापूर, लातूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करणे, यांसह विविध मागण्या करत खासदारांनी रेल्वेच्या समस्या, अडचणी याबाबत प्रश्न उपस्थित करत सुधारणेबाबत सूचना दिल्या.
पुणे, सोलापूर क्षेत्रांतील खासदारांच्या उपस्थितीत रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, ऍड. वंदना चव्हाण, रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील माने, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सदाशिव किसन लोखंडे, डॉ. सुधाकर श्रंगारे उपस्थित होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी, पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे यांसह अधिकारी उपस्थित होते.
बारणे यांची पुणे, तर डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची सोलापूर रेल्वे विभाग संसदीय समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीत अधिकाऱ्यांनी नवीन थांबे, विविध स्थानकांवरील लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा, लेव्हल क्रॉसिंग, रेल्वे फाटकाच्या जागी भुयारी मार्ग, ओव्हर ब्रिज यांसह ट्रॅक दुहेरीकरण, थांबे, प्लॅटफॉर्म विस्तार, विद्युतीकरण, प्रवाशांसाठी सुविधा, यूटीएस ऍप तिकीट प्रणाली, स्थानकांचे सुशोभीकरण याबाबत माहिती दिली. या बैठकीत बैठकीत 9 खासदार उपस्थित होते. तर अन्य 15 खासदारांनी लेखी सूचना व मागण्या पाठवल्या. त्यामुळे आज एकूण तीनशेहून अधिक विषयांवर चर्चा झाली.
“पुणे-लोणावळा मार्गावरील तिसरी, चौथी लाइन सुरू करावी. लोकल ट्रेन दौंडपर्यंत होणे आवश्यक आहे. लोणावळा-दौंड विभागात ईएमयू रेक देखभाल डेपो तयार करणे. लोणावळ्याजवळ गुड्स शेड उभारण्याची मागणी केली.” – ऍड. वंदना चव्हाण, खासदार
रेल्वेप्रश्नी खासदार म्हणाले…
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गातील भूसंपादन सामंजस्याने करावे. पुणे-हरंगुळ एक्स्प्रेसच्या वेळेबाबत चर्चा झाली. पुणे-अमरावती, कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेसचे नियमितीकरण, विविध मार्गांवर पाणी साचणे आणि ड्रेनेज समस्या, स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणे हे मुद्दे मांडले. – ओमराजे निंबाळकर, खासदार, धाराशिव
अमृत भारत स्थानकाच्या विकास कामांना गती द्यावी. मुंबई-कोल्हापूर वंदेभारत ट्रेन सुरू व्हावी. पुणे-फलटण डेमूचा प्रश्नासह रेल्वे मार्गावरील ओव्हर ब्रीज, पुलाखालील रस्त्यांची कामे व्हावीत. – रणजितसिंह निंबाळकर, खासदार, माढा
हातकणंगले-इचलकरंजी मार्ग प्रगतीचा आढावा घेतला. महालक्ष्मी एक्स्प्रेसचे कोच खराब आहेत. त्यात सुधारणा व्हावी. कोच वाढवावेत. रुकडी, जयसिंगपूर येथे थांबा द्यावा. कोल्हापूर-वैभववाडी मार्गाच्या प्रगतीसह अंडरपासवरील समस्या मांडल्या. – धैर्यशील माने, खासदार, हातकणंगले
दौंड-कलबुर्गी शटल सेवा सुरू करणे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मोहोळ येथे थांबा द्यावा. सांगोला-मंगळवेढा-सोलापूर नवीन लाइन सुरू करणे, दुधनी स्टेशनवर ट्रेन्सला थांबा देण्याबाबत प्रस्ताव दिला. – डॉ. सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार, सोलापूर
अमृत भारत स्टेशन विकास कामांची प्रगतीचा आढावा घेतला. तळेगाव स्टेशनवर ट्रेन्सला थांबा द्यावा. पुणे ते लोणावळा लोकल ट्रेनची सेवा वाढवणे, असे मुद्दे मांडले. – श्रीरंग बारणे, खासदार, मावळ
पुणे-नाशिक मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बेलापूर येथे रेल्वे थांबा द्यावा. शिर्डी रेल्वे स्थानक ते शिर्डी साई मंदिरादरम्यान नवीन रस्त्याचे बांधकाम व्हावे. – सदाशिव लोखंडे, खासदार, शिर्डी
लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेसचे डबे वाढवावेत. हडपसर-काजीपेठ एक्सप्रेस दररोज सोडावी. लातूर पिट लाइन काम, येथील कोच कारखान्याचे काम पूर्ण व्हावे. लातूर-मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू व्हावी. – सुधाकर श्रंगारे, खासदार, लातूर
अमृत भारत स्थानकाच्या विकास कामांची प्रगती, ट्रॅक दुहेरीकरण तसेच रुळांच्या बाजूने वृक्षारोपण करणे. पुणे-मिरज मार्गाचा आढावा घेतला. – श्रीनिवास पाटील, खासदार, सातारा





