RBI : रुपया घसरण्यापासून वाचवण्यासाठी RBIचा मोठा निर्णय; तेल कंपन्यांना थेट मिळणार डॉलर
RBI : डॉलरच्या तुलनेत रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी RBIने तेल कंपन्यांसाठी विशेष डॉलर विंडो सुरू करण्याचा निर्णय घेतला. जाणून घ्या RBIच्या निर्णयाचा रुपयावर काय परिणाम होईल.

RBI : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआयने मोठी पावले उचलली आहेत. 9 ऑक्टोबर रोजी RBIने याबाबत घोषणा केली. रुपया 96.73 प्रति डॉलरवर बंद झाला असून तो आतापर्यंतच्या नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे चलन बाजारातील दबाव कमी करण्यासाठी RBIने हा निर्णय घेतला आहे.
तेल कंपन्यांसाठी विशेष डॉलर विंडो –
RBI सोमवारपासून तीन सरकारी तेल कंपन्यांसाठी विशेष विंडो सुरू करणार आहे. Indian Oil Corporation, Hindustan Petroleum आणि Bharat Petroleum या कंपन्यांना या माध्यमातून थेट RBIकडून डॉलर मिळतील. त्यामुळे बाजारातून डॉलर खरेदी करण्याची त्यांची गरज कमी होईल.
रुपयावरील दबाव कमी होण्याची शक्यता –
तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात डॉलरची गरज असते. त्यासाठी त्या बाजारातून डॉलर खरेदी करतात. त्यामुळे डॉलरची मागणी वाढून रुपयावर दबाव येतो. RBIच्या विशेष विंडोमुळे ही मागणी बाजारातून काही प्रमाणात दूर होईल. परिणामी रुपयातील चढ-उतार कमी होण्यास मदत होऊ शकते.
चलन डेरिव्हेटिव्ह व्यवहारांवरही मर्यादा –
RBIने रुपयाशी संबंधित एक्सचेंज-ट्रेडेड करन्सी डेरिव्हेटिव्हमध्ये एका पक्षासाठी असलेली पोझिशन मर्यादा 10 कोटी डॉलरवरून 50 लाख डॉलर केली आहे. तसेच फॉरेक्स डीलर्सना रुपयाशी संबंधित डेरिव्हेटिव्ह व्यवहारांसाठी ‘फॉरेन एक्सचेंज रिस्क रिझर्व्ह’ ठेवण्यास सांगितले आहे. हे प्रत्येक व्यवहाराच्या नाममात्र रकमेच्या 20 टक्के असेल.
रुपया नीचांकी पातळीच्या जवळ –
9 ऑक्टोबरला रुपया 96.73 प्रति डॉलर या पातळीवर बंद झाला. मे महिन्यात रुपया 96.96 प्रति डॉलर या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. RBIच्या या उपायांमुळे डॉलरची बाजारातील मागणी कमी होऊन रुपयावरील दबाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर परिणाम होऊ शकतो.





