Rupee: रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी रिझर्व बँकेने गेल्या आठवड्यात आक्रमक उपाययोजना केल्या. बँकांच्या परकीय चलन व्यवहाराला काही प्रमाणात मर्यादा आणल्या आहेत. अशा परिस्थितीत सोमवारी रुपयाचा भाव 14 पैशांनी वाढून 93.04 प्रति डॉलर या पातळीवर गेला. रुपयाचे मूल्य सुधारत असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांनाही आधार मिळत आहे. दरम्यानच्या काळामध्ये आखातातील युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न वाढले आहेत. त्यामुळे खनिज तेलाचे दर सोमवारी बरेच कमी झाले. या घडामोडीचा रुपयाला आधार मिळाला असल्याचे दिसून येते. मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. त्यामुळे रुपयाचे मूल्य कमी -अधिक प्रमाणात अस्थिर राहण्याची जास्त शक्यता आहे. हेही वाचा – Stock Market: युद्धविरामाच्या आशेने बाजारात उसळी; सेन्सेक्स 787 अंकांनी वाढला, निफ्टी 22,968 वर बंद रिझर्व बँकेच्या पत धोरण समितीची बैठक सोमवारी चालू झाली असून बुधवारी पतधोरण जाहीर होणार आहे. यावेळी रिझर्व्ह बँक रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रुपयाचे मूल्य गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कोसळून 95 रुपये प्रति डॉलर इतक्या निचांंकी पातळीवर गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना वाढविल्या. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचे विश्लेषकांनी या संदर्भात बोलताना सांगितले.