देशाचा GDP वाढीचा दर का कमी झाला? RBI गव्हर्नर दास यांनी सांगितले कारण, जाणून घ्या

RBI On GDP Growth Rate: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली होती, त्यामुळे सरकारी खर्च कमी झाल्यामुळे एप्रिल-जून तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 15 महिन्यांच्या नीचांकी 6.7 टक्क्यांवर आला, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शनिवारी दिली आहे.
आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीसाठी 7.1 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. तथापि, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या पहिल्या आगाऊ अंदाज डेटामध्ये विकास दर 6.7 टक्के होता, असे दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
निवडणुकीमुळे सरकारी खर्च कमी झाला –
दास म्हणाले की, जीडीपी वाढीसाठी जबाबदार घटक आणि मुख्य चालक जसे की उपभोग, गुंतवणूक, उत्पादन, सेवा आणि बांधकाम यांनी सात टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. RBI गव्हर्नर म्हणाले की फक्त दोन पैलूंनी विकास दर किंचित खाली आणला आहे आणि ते आहेत – सरकारी खर्च (केंद्र आणि राज्य दोन्ही) आणि शेती. ते म्हणाले की, पहिल्या तिमाहीत सरकारी खर्च कमी राहिला आणि हे कदाचित निवडणुका (एप्रिल ते जून) आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी यामुळे झाले.
कृषी क्षेत्राची वाढ कमी राहिली –
दास म्हणाले, येत्या तिमाहीत सरकारी खर्चात वाढ होईल आणि विकासाला आवश्यक मदत मिळेल. कृषी क्षेत्राने एप्रिल ते जून या तिमाहीत सर्वात कमी वाढीचा दर सुमारे दोन टक्के नोंदवला आहे. ते म्हणाले की, मान्सून खूपच चांगला झाला असून त्यामुळे सर्वजण कृषी क्षेत्राबाबत आशावादी आणि सकारात्मक आहेत. अशा परिस्थितीत, आम्हाला खात्री आहे की येत्या तिमाहीत आरबीआयच्या अंदाजानुसार 7.2 टक्के वार्षिक विकास दर शक्य होईल राहील, असे गव्हर्नर दास म्हणाले.





