Raza Murad: “मी जिवंत आहे !”… खोट्या मृत्यूच्या अफवेने त्रस्त झाले अभिनेता रजा मुराद, पोलिसांत केली तक्रार

Raza Murad: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद सोशल मीडियावर पसरलेल्या त्यांच्या मृत्यूच्या खोट्या अफवेने अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यांनी या अफवेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
रजा मुराद यांनी सांगितले की, सोशल मीडियावर अचानक त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरली. एवढंच नव्हे तर त्यांच्या छायाचित्रावर श्रद्धांजली संदेश, जन्म व मृत्यू दिनांकही लिहून पोस्ट केल्या गेल्या. हे पाहून ते स्वतःही थक्क झाले.
“मी जिवंत आहे हे लोकांना समजावून सांगता-सांगता थकलो आहे. देशातून आणि विदेशातून सतत फोन येत आहेत. सगळ्यांना सांगून सांगून माझा गळा बसला, ओठ सुकले आणि मानसिक त्रास झाला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या खोट्या बातमीमुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर प्रचंड ताण आला. लोक त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होते, पण ही बातमी पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आधीही पसरल्या आहेत अशा अफवा
रजा मुराद यांच्या पूर्वीही अनेक दिग्गज कलाकार अशा खोट्या बातम्यांचे बळी ठरले आहेत. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, मनोज कुमार आणि श्रेयस तळपदे यांच्या मृत्यूच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर अनेकदा पसरल्या होत्या.
रजा मुराद यांच्या मते, अशा अफवा केवळ दिशाभूलच करत नाहीत तर संबंधित कलाकारांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करतात.

