पुणे | रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसची उमेदवारी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली असून, पुण्यातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून धंगेकर यांच्या नावाची शहरभर चर्चा होती. अखेर आज त्याला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे आता पुण्यात धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लोकसभेची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने त्यांच्या दुसऱ्या यादीत पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली होती. मात्र, काँग्रेसने महाराष्ट्रातील एकही जागा जाहीर केली नव्हती. गुरुवारी सात जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यातील एक नाव पुण्यातील धंगेकर यांचे आहे.
धंगेकर हे सध्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. गिरीश बापट खासदार झाल्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नगरसेवक पदावरील धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यात यश मिळवले होते. त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करत आमदारकी मिळविली होती.
दरम्यान, शहर काँग्रेसने मंगळवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आणि नियोजनासाठी बैठक बोलावली होती. त्याला सर्व इच्छुक उपस्थित होते. यामध्ये कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. विठ्ठलराव गाडगीळ आणि त्यानंतर सुरेश कलमाडी यांनी राखलेली पुण्याची खासदारकीची काँग्रेसची जागा भाजपने दहा वर्षांपूर्वी मिळवली होती. आता पुन्हा एकदा ती जागा मिळविण्यात काँग्रेसला पर्यायाने धंगेकरांना यश मिळणार का, हे येत्या काही दिवसांत समजणार आहे.





