Ravi Naik Pass Away : गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री रवी नाईक यांचे आज पहाटे फोंडा येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच गोवा सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
रवी नाईक यांचे घर गोव्याची राजधानी पणजीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते घरीच होते. त्यांना तात्काळ फोंडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री 1 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रवी नाईक यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली.
त्यांनी सुमारे २८ महिने हे पद सांभाळले. त्यानंतर पुन्हा एकदा १९९४ मध्येही ते मुख्यमंत्री झाले होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी फोंडा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपसाठी हा मतदारसंघ पहिल्यांदा जिंकून दिला. त्यानंतर ते सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.





