पिंपरी | रवी लांडगे यांचा ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश

पिंपरी, (प्रतिनिधी) – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत भोसरीतील माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी सहकाऱ्यांसह पक्षप्रवेश केला. रवी लांडगे यांनी ठाकरेंची मशाल हाती घेतल्याने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकारणाची दिशा बदलली आहे.
रवी लांडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी आगामी निवडणुकीत पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात मिळणार असल्याचे कसलेही संकेत पक्षाकडून देण्यात आलेले नाहीत.
मुंबई येथील मातोश्री बंगल्यावर रवी लांडगे यांचा आज मंगळवारी (दि. २०) जाहीर प्रवेश झाला आहे. त्यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख सचिन अहिर,
शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक एकनाथ पवार, धनंजय आल्हाट, माजी नगरसेविका श्रध्दा लांडगे तसेच शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी दोन वर्षापूर्वी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात होते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी घड्याळाचा प्रचार केला. भाजपात असताना आमदार महेश लांडगे यांचे तगडे आव्हान समोर असल्याने रवी यांना पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटली होती.
त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. भोसरीची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटेल,
असा अंदाज बांधून त्यांनी हाती मशाल घेतली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भोसरीच्या राजकीय मैदानात चांलगील रंगत पहायला मिळणार आहे.





