Sanjay Raut : नाशिकमधील मोर्चाअगोदर राऊतांचे CM फडणवीसांना थेट आव्हान; म्हणाले” मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसह…”

Sanjay Raut : गेल्या काही काळापासून ठाकरे बंधूंची राजकीय युती होणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. राजकीय युतीचे संकेत मिळाले असले तरी अद्यापर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नुकतीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवसास्थानी जात त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही पक्ष म्हणजेच शिवसेना उबाठा आणि मनसे नाशिकमध्ये एकत्र येणार आहेत.
नाशिकमध्ये दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांतील बडे नेते थेट मुंबईहून नाशिकला रवाना झाले आहेत. या मोर्चाच्या अगोदर खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना थेट आव्हान दिलं आहे.
नाशिक शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे. विकासासाठी त्यांनी यावर उत्तर द्यावे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत नाशिकचा दौरा करावा व तेथील परिस्थिती जाणून घ्यावी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. या संयुक्त मोर्चाचा टीझर संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, टोळ्यांची दहशत, सोनसाखळी चोरीच्या घटना, आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात आवाज उठवला जाणार आहे. आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापणार असल्याचं बोललं जात आहे.
नाशिक सारख्या धार्मिक आणि क्रांतिकारी जिल्ह्यात आज अराजक माजले आहे!
भ्रष्टाचारगुंडगिरी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, खुलेआम ड्रग्स यामुळे नाशिक बदनाम होत आहे
देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकची ही व्यथा
आज शिवसेना म न से तर्फे नाशकात जन आक्रोश मोर्चा
@Dev_Fadnavis pic.twitter.com/Y78uvPiMtP— Sanjay Raut (@rautsanjay61) September 12, 2025
या मेळाव्यासाठी मनसेचे अनेक नेते मैदानात असणार आहेत. याशिवाय शिवसेनेचे नेतेही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर आणि आमचे स्थानिक नेते देखील तिथे उपस्थित आहे. मला देखील या मोर्चाला येण्याचा आग्रह करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मी तिथे जात आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.





