Ratnagiri News : सुट्टीत गावी आलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; रत्नागिरीमधील घटना

रत्नागिरी : राज्यात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. या काळात मुले आपल्या गावी जातात. असाच मुंबईहून एक चिमुकला त्याच्या गावी रत्नागिरीला गेला होता. मात्र त्याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. आपल्या नातेवाईकांबरोबर गावी आलेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी जवळ धामणसे येथील सोमगंगा नदीच्या डोहात बुडून देवांश श्रावण मोरे याचा मृत्यू झाला आहे. देवांशचे वय केवळ 6 वर्षे होते. मुंबई येथील जोगेश्वरी येथे तो राहत होता. शाळेला सुट्टी लागल्याने आपल्या नातेवाईकांसोबत तो गावी आला होता. मात्र, त्याच्यावर काळाचा घाला झाला आणि कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले.
अधिकची माहिती अशी की, देवांश हा मुंबईहून 9 एप्रिल रोजी कोकणात गावी सत्यनारायणाची पूजा आणि पालखीसाठी आला होता. शुक्रवारी 11 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास देवांश नातेवाईक आणि वाडीतील इतर मुलांसोबत धामणसे जोशी वाडी येथील सोमगंगा नदीवरील डोह येथे आंघोळीसाठी गेला होता. याच दरम्यान देवांश पाण्यात बुडाला. त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले व जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथे त्याची डॉक्टरांनी तपासणी केली व रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासून देवांशला मृत घोषित केले.





