Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये 2 कोटींचे चरस जप्त; मिशन फिनिक्स अंतर्गत केली कारवाई

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली व मंडणगड तालुक्यात पोलीसांनी कारवाई करत सुमारे २ कोटी २२ लाख रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एक आरोपी अद्याप फरार असुन त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. मिशन फिनिक्स अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
दापोली पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. केळशी किनारा मोहल्ल्यात अनार इस्माईल डायली (३२) यांच्या घरावर छापा टाकून ०.९९८ किलो वजनाचा चरस जप्त केला. याची किंमत सुमारे २४ लाख रुपये होती. चौकशीत अनारने अकिल अब्बास होडेकर (४९) कडून हा चरस विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले आहे.
पोलिसांनी अकिल होडेकरला ताब्यात घेत त्याच्याकडून मंडणगड तालुक्यातील साखरी गावातील समुद्रकिनाऱ्यावर लपवलेले उर्वरित ४ पिशव्यामधील चरस जप्त करण्यात आला. एकूण ४.७३१ किलो चरस जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे २ कोटी १८ लाख ९२ हजार रुपये एवढी आहे. तपासादरम्यान तावीस महमूद डायली (३०) यालाही या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना ठाणे शहरातील शिळ डायघर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी ममुद बदुद्दीन ऐनटकर (२९) याचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.





