Rationing Black Market – केडगाव (ता. दौंड) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या मालावर महसूल विभागाच्या पुरवठा शाखेने कारवाई केली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तु कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक पंकज गोपाळ गोरे (वय ३४वर्षे, दौड तहसील) यांनी फिर्याद दिली असून गोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील विश्वनाथ निंबाळकर (रा.केडगाव,ता.दौंड,जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दि.७ रोजी केडगाव,ता.दौंड गावच्या हद्दीत असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गाळ्यामध्ये सुनील निंबाळकर याने कृषी उत्पन्न बाजार समिती,केडगाव यांचेकडून भाडोत्री घेतलेल्या गाळयात घाऊक व्यापाराचे अनुज्ञप्ती आदेश खंड 4(2) हा जिन्नस साठवणूक करण्याच्या लायसन्सची मुदत सन २०१७ व २०१८ मध्येच संपली असतानाही या गाळ्यात पांढरे रंगाचे नायलॉनचे ४५ ते ५० किलोग्रॅम वजनाचे एकूण ४९२ कट्टे गहु ज्याची किंमत ८ लाख ८५ हजार सहाशे रुपये व ४५ ते ५० किलोग्रॅम वजनाचे एकूण १४४ पांढरे रंगाचे नायलॉनचे कट्टे तांदुळ ज्याची किंमत २ लाख ८४ हजार रुपये, असा एकूण किंमत १० लाख ६९ हजार ८५६ रुपये किंमतीचा सरकारमान्य रास्त भाव दुकानातील काळ्या बाजाराने विक्री करण्याचे उद्देशाने साठवनीत असल्याचा मिळून आला असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.