तर्कनिष्ठ चिकित्सा हा राजा ढोलेंच्या साहित्याचे गुणविशेष: डॉ.सपकाळ

कोल्हापूर: तर्कनिष्ठ चिकित्सा हा राजा ढाले यांच्या साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा गुणविशेष आहे. त्यांच्या साहित्याचे समकालीन संदर्भांच्या अनुषंगाने आकलन व अध्ययन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अनिल सपकाळ यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव परिषद शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना ‘राजा ढाले यांचे मराठी साहित्यातील योगदान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.

डॉ. सपकाळ म्हणाले, उपेक्षित, वंचित अशा समाजव्यवस्थेतून पुढे येऊन सामाजिक न्यायासाठी वैचारिक, धार्मिक आणि साहित्यिक अशा विविध पातळ्यांवर राजा ढाले यांनी प्रस्थापितांविरोधात संघर्ष पुकारला. भाषिक आणि सांस्कृतिक व्यवहाराच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तीत्वाला अनेक कंगोरे आहेत. त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांच्या अभिव्यक्तीची दिशा ही एकमेकांपासून अभिन्न आहे. त्यांच्या जीवनातल्या चढउतारांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक निर्मितीमध्ये पडल्याचे दिसून येते. कलावंताचे सृजन आणि कार्यकर्त्याची बंडखोरी यांची व्यामिश्रता आणि विजिगिषु वृत्ती ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी निर्माण केलेल्या सर्व प्रकारच्या साहित्यकृतींमध्ये त्याचे प्रतिबिंब आढळते, असे त्यांनी सांगितले.

राजा ढाले यांचे काव्य हे अंतर्बाह्य एकरुप आणि रुपनिष्ठ असल्याचे सांगून डॉ. सपकाळ म्हणाले, रुपनिष्ठ जाणिवांशी जोडलेल्या राजाभाऊंच्या काव्यात लयबद्धता, लयतत्त्व प्रकर्षाने आढळते. कविता हा त्यांचा महत्त्वाचा चिकित्सा विषय होता. नव्वदोत्तर कालखंडात ते रुपबंधाकडून आशयाग्रहाकडे वळलेले दिसतात. सर्व साहित्य, भाषणे यांतून त्यांनी आशयात्मकतेसाठी सातत्याने आग्रही प्रतिपादन केले. शोषणाच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी साहित्य समीक्षेच्या माध्यमातून भाषिक व्यवहाराला दिलेले योगदान ओलांडून मराठी भाषेच्या अभ्यासकाला पुढे जाता येणार नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, राजा ढाले यांनी मराठी साहित्यविश्वाला अत्यंत व्यापक स्वरुपाचे योगदान दिले. आंबेडकरवाद आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा पाया घेऊन त्यांनी मराठी साहित्याची अभिनव पद्धतीने मांडणी केली. परंपरेला नाकारताना विद्रोहाची पेरणी करत असतानाही त्यांनी साहित्यिक भान हरपू दिले नाही. त्यांची सारी साहित्य निर्मिती अस्वस्थतेतून झाली. बंडखोर कार्यकर्ता असूनही कवितेमधील निरागस भाव जपण्याचे त्यांचे भान आणि कौशल्य वादातीत होते, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जगन कराडे, डॉ. पी.एस. कांबळे, प्रा. विनय कांबळे, प्रा. अमर कांबळे, प्रा. युवराज देवाळे, नामदेव कांबळे यांच्यासह शिक्षक, नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)