Ratan Thiyam : रंगभूमीवरील ‘रत्न’ हरपले ! रतन थियाम यांचे निधन

इंफाळ : मणिपूरचे नाट्य दिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते रतन थियाम यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी बुधवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. रतन थियाम यांचा जन्म मणिपूरमध्ये झाला आणि त्यांचे वडील मणिपुरी नृत्यशैलीचे कलाकार होते. त्यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती.
बऱ्याच काळापासून ते आजारी असल्यामुळे त्यांना इंफाळ येथील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आणि त्यांनी तिथे अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे लोकसभा सदस्य गौरव गोगोई यांनी त्यांचा फोटो शेअर करताना ही बातमी दिली. गौरव यांनी रतन यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. रतन यांच्या जाण्याने चाहते देखील दुःख व्यक्त करत आहेत.
तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, रतन थियाम यांच्या कलेत मणिपूरचा आत्मा वास्तव्य करतो. ते केवळ एक नाट्य कलाकार नव्हते तर मणिपुरी संस्कृतीचे वाहक होते. त्यांचे समर्पण आणि दूरदृष्टी भारतीय रंगभूमीसाठी एक अमूल्य वारसा बनली आहे.




