रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Ratan Tata Passed Away | जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले रतन टाटा यांचे बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रतन टाटा आजारी असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता निवासस्थानाकडून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे. येथे गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 3.30 या वेळेत लोकांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी घोषणा केली आहे. तसेच आज शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.





