दसऱ्यानिमित्त राष्ट्र सेविका समितीचे पथसंचलन

पुणे – शस्त्र पूजन आणि विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र सेविका समितीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतात 17 ठिकाणी सघोष पथसंचलन रविवारी झाले. राष्ट्र सेविका समिती या अखिल भारतीय महिला संघटनेचा विजया दशमी हा स्थापना दिन. यंदा 87 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकाच दिवशी एकाच वेळी नासिक, नगर, बारामती, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, कराड यासह पुणे महानगरातील सिंहगड, कसबा, कोथरूड, येरवडा, पर्वती, विद्यापीठ या सहा भागात एकूण 17 ठिकाणी सघोष पथसंचलने उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झालीत.
या संचलनात एकूण दोन हजार 910 सेविका संपूर्ण गणवेशात सहभागी झाल्या. तर एकूण उपस्थिती तीन हजार 968 होती. पाच वर्षांची बाल सेविका ते 92 वर्षांच्या जेष्ठ सेविका, अशा सर्व वयोगटातील सेविका उपस्थित होत्या. विदेशात स्थिरावलेल्या कामानिमित्त भारतात आलेल्या सेविका ही अभिमानाने संपूर्ण गणवेशात सहभागी झाल्या होत्या.
पिंपळगाव बसवंत, बार्शी, कोपरगाव इ. तालुक्याच्या गावी प्रथमच अशा प्रकारचे महिलांचे संचलन झाले. घोष गणात तरुणींबरोबर गृहिणींचाही समावेश होता. एकूण 395 घोष वादकांनी विविध रागाचे वादन केले. काही भागातील भगिनी संचलन मार्गावर 500 मीटर पुढे जाऊन स्वतः शंख वाजवून संचलन येत असल्याची सूचना देत होत्या.
शस्त्रपूजन, प्रार्थना झाल्यावर ध्वजाला औक्षण करण्यात आले. त्यानंतर घोषाच्या निनादात संचलनास सुरुवात झाली. विविध जिल्ह्यात व भागात आयोजित केलेल्या या पथ संचलनाचे नागरिकांनी ही उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या, स्वागत तोरणे, कमानी उभारण्यात आल्या होत्या.

