‘औरंगजेबाचा मुद्दा हा…’, नागपूरमधील हिंसाचारावर संघाने दिली पहिली प्रतिक्रिया, काँग्रेसनेही मांडली भूमिका

Nagpur violence | छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर अफवा पसरल्याने नागपूर येथे दोन गटात झालेल्या भीषण राड्यात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा महत्त्वाचा नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नसल्याचे संघाने म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी नागपूर येथे घडलेल्या हिंसाचारावर मत मांडले. प्रसार माध्यमांशी बोलताना आंबेकर म्हणाले की, औरंगजेबचा मुद्दा सध्या महत्त्वाचा नाही.
#WATCH | Bengaluru, Karnataka: When asked if Aurangzeb is still relevant today and whether his tomb should be removed, Sunil Ambekar, Akhil Bharatiya Prachar Pramukh, RSS, says, “I think it is not relevant.”
On the Nagpur violence, he says, “Violence of any kind is not good for… pic.twitter.com/7q0e6f9D5m
— ANI (@ANI) March 19, 2025
कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजाच्या आरोग्यासाठी चांगली नाही. मला वाटते की पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे व ते याचा तपास करत आहे, असे म्हणत आंबेकर यांनी नागपूरातील घटनेबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली. तसेच, यावेळी गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान संघाच्या मुख्यालयाला भेट देणार का? असा प्रश्नही आंबेकर यांना विचारण्यात आला. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याचे म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले.
संघाच्या या भूमिकेवर काँग्रेसने देखील प्रतिक्रिया दिली आहे. संघाचे भूमिकेचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे. आरएएसने जर ही भूमिका घेतली असेल तर ती योग्यच आहे. देशासमोर अनेक मोठे प्रश्न आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिली.
दरम्यान, सोमवारी घडलेल्या हिंसाचारानंतर सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या आतापर्यंत 46 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.




