मुंबई : शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. शिवसेना फुटीची सल अजूनही कट्टर शिवसैनिकांच्या मनात आहे. यादरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे कोकणातील आमदार भरत गोगावले यांनी एक गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काय केला आरोप? आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा. आम्ही मातोश्रीवरून परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार आमदारांना एंट्री नाही. आता ज्या एंट्री आहेत ती रहायला पाहिजे. संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशीच स्थिती होणार, असे भरत गोगावले म्हणाले. उद्धव ठाकरेंना लगावला टोला आम्ही आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि कायम त्यांच्या सोबत आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपत आहोत. त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षाचे चिन्ह आम्हाला मिळाला आहे. तसेच दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स पण गमावला, असा टोलादेखील गोगावले यांनी लगावला. किशोरी पेडणेकरांनी दिले प्रत्युत्तर भरत गोगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले आहे. टू द पॉईंटला आता यांना साक्षात्कार होत असतील तर मला वाटतं आता यांचा पॉइंटच चुकला आहे. जे पॉईंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे अधोगतीला पोहचण्याची लक्षण त्यांची दिसत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. ज्या पद्धत्तीने पती- पत्नी, माँ माँ ज्या पद्धत्तीने घरात वागत होत्या, टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत. रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा, संस्कार आहेत तेच रश्मी वहिनी करत आहेत. जेव्हा साहेब ओरडले तर हीच लोक वहिनींना मध्यस्थी करायचे. आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातला टू द पॉईंट म्हणून जर काढत असतील, तर याला म्हणतात बुद्धीची कीव करावी, बुध्दीची अधोगती बघावी, असा घणाघात त्यांनी केला.