आजपासून ‘रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट’

पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची होणार तपासणी
पुणे – करोना प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून बुधवारपासून “रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट’ करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 लाख किट शहरात दाखल झाल्या. महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात, करोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स तसेच कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.
शहरात करोनाबाधितांचा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे. त्यांच्या संपर्कातील संशयितांचे नमुने घेतल्यानंतर त्यांचे अहवाल येण्यास 24 ते 48 तास लागतात. त्यामुळे चाचणीचे नमुने घेतलेल्या 7 ते 8 हजार जणांना एकाचवेळी विलगीकरण करावे लागते. त्यातून बाधितांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
ही बाब लक्षात घेऊन संशयितांच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी करण्यासाठी केंद्राने मान्यता दिलेल्या “रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट’चा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सुमारे साडेचार कोटी रुपयांची एक लाख किट महापालिकेने खरेदी केल्या आहेत. ही किट शहरात दाखल झाली असून बुधवारी या किटचा वापर सुरू केला जाणार आहे. दरम्यान, या किटचे सादरीकरण आरोग्य विभागाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी महापौरांसमोर केले असून महापौरांनी लवकरात लवकर चाचण्यांचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या.
बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी
आरोग्य विभागाकडून पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यात रुग्णालये, कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्षात काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर महापालिकेच्या प्रसृतीगृहांमध्ये नोंद असलेल्या गर्भवती महिलांची आणि गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या ज्येष्ठांच्या तपासणीसह दैनंदिन बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी या किटद्वारे होणार आहे.



