राफेलची पहिली बॅच 27 जुलैला येणार

नवी दिल्ली – फ्रांसकडून भारतीय हवाईदलाला राफेल या लढाऊ विमानांची पहिली तुकडी येत्या 27 जुलैला मिळणार आहे. या पहिल्या तुकडीत सहा विमाने असणार आहेत. भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांपासून हवाईदलाला दक्षतेचा आदेश देण्यात आला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर हवाईदलाला राफेल विमानांची ही पहिली तुकडी मिळणार आहे. या विमानांची डिलिव्हरी त्वरीत मिळावी अशी सुचना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांना फोनवरून केली होती.
त्यावेळीच फ्रांसच्या संरक्षण मंत्र्यांनी नियोजित वेळेनुसारच भारताला ही विमाने दिली जात आहेत असे सांगितले. राफेल विमाने भारतीय हवाईदलात समाविष्ट झाल्यानंतर हवाईदलाची मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राफेलची ही पहिली स्क्वाडरंट अंबाला हवाईतळावर तैनात केली जाणार आहे भारताने फ्रांसशी एकूण 36 राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे.





