रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचा उलगडा : पुणे ग्रामीण पोलिसांच्या शर्थीच्या तपासाला यश, आरोपी गजाआड

शिरूर: पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती (ता. शिरूर) परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. दोन चिमुरड्या मुलांसह एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तब्बल १५ दिवसांच्या अथक तपासानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करून गुन्ह्याचा छडा लावला आहे.
दिनांक २३ मे २०२५ रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे (वय ३६, रा. सरदवाडी, ता. शिरूर, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याने स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) आणि तिच्या दोन मुलांना, स्वराज (वय ४) आणि विराज (वय २), आळंदी येथून दुचाकीवर घेऊन गेला. रात्रीच्या सुमारास रांजणगाव गणपती परिसरातील ग्रोवेल कंपनीजवळील निर्जन स्थळी त्याने तिघांचा गळा आवळून आणि डोक्यात दगड मारून क्रूरपणे खून केला. गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत स्वाती ही आरोपीच्या भावाची पत्नी, म्हणजेच गोरख बोखारे हा तिचा दीर होता. स्वातीने दुसरे लग्न करण्याच्या इच्छेला आरोपीने विरोध केल्याने त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे तपासात उघड झाले.
या हत्याकांडाने पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विशेष पथके स्थापन करण्यात आली. पुणे, बीड आणि नगर जिल्ह्यांमध्ये व्यापक तपास करत, तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फूटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
या तपासात पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, एस.डी.पी.ओ. प्रशांत ढोले, बापूराव दडस, पोनि. अविनाश शिळीमकर, पोनि. महादेव वाघमोडे, विश्वास जाधव, दत्ताजीराव मोहिते, पोसई अविनाश थोरात, सविता काळे, महेश डोंगरे, दीपक साबळे, तुषार पंदारे आणि त्यांच्या पथकांनी अथक परिश्रम घेतले. तब्बल ५० हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन आरोपीला जेरबंद केले.
सध्या आरोपीला रिमांडवर घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील सामाजिक, कौटुंबिक आणि मानसिक पैलूंचा सखोल अभ्यास पोलिसांकडून केला जात आहे. एका नातेवाईकाने अशा प्रकारे अमानुष कृत्य केल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेने आणि कसून तपासाने या गुन्ह्याचा उलगडा झाला.





