Ranjangaon Crime : पोलिसांची मोठी कारवाई! रांजणगावमध्ये २८ किलो गांजा जप्त ; दोन आरोपी पोलीस कोठडीत

प्रभात वृत्तसेवा
रांजणगाव गणपती – रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बाभूळसर खुर्द येथे मोठी कारवाई करत तब्बल ७ लाख रुपये किंमतीचा २८ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ सप्टेंबर रोजी सकाळी छापा टाकण्यात आला. या कारवाईत दिव्या अतुल गिरे (वय २७, रा. बाभुळसर खुर्द) व सुरज दिलीप शिंदे (वय २८, देवदैठण, ता. श्रीगोंदा) या दोघांना अटक करण्यात आली.
तपासाअंती उघड झाले की, हा गांजा अतुल संतोष गिरे (रा. बाभुळकर खुर्द, मूळ रा. देवदैठण ता. श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) याने विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी दिव्या अतुल गिरे हिच्या घरी साठवलेला गांजा जप्त केला. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला २८ किलो गांजा हा फरार आरोपी अतुल वसंत गिरे याने हा गांजा कोणाकडून विक्रीसाठी आणला आहे? कोणाला विक्री करणार होता? याबाबत पुढील अधिक तपास सुरू आहे.ही कामगीरी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, हवालदार विजय सरजिने, हवालदार विलास आंबेकर, हवालदार गणेश वाघ, हवालदार उमेश कुतवळ, प्रविण पिठले, योगेश गुंड, हवालदार विद्या बनकर, हवालदार माऊली शिंदे, पांडुरंग साबळे, हवालदार रामेश्वर आव्हाड, हवालदार हेमंत इनामे यांनी केली आहे. या गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करीत आहेत.



