मुंबई पोलीस कंट्रोल रूमला राणी मुखर्जीची भेट 

ही भेट माझ्यासाठी अतिशय माहितीपर आणि शैक्षणिक स्वरुपाची होती 

मुंबई – ‘मर्दानी’ चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी २’ चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘मर्दानी २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटात राणी निडर आणि निश्चयी पोलिस अधिकारी शिवांगी शिवाजी रॉयची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, नुकतंच राणी मुखर्जीने मुंबईच्या पोलीस कंट्रोल रुमला भेट दिली असून, यावेळी तिने देशाची सद्यस्थिती आणि सायबर क्राइमवर मोकळेपणाने चर्चा केली.

यावेळी राणी म्हणाली, “आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज पोलिसांमार्फत केलं जाणारं अमाप काम पाहून मी अक्षरश: थक्क झाले. पोलीस अधिकारी अतिशय पद्धतशीरपणे, स्वत:ची पर्वा न करता त्यांचं कर्तव्य बजावत असतात. आपल्या सुरक्षेसाठी ते किती कष्ट घेतात हे वास्तव डोळे उघडणारे आहे. ही भेट माझ्यासाठी अतिशय माहितीपर आणि शैक्षणिक स्वरुपाची ठरली. तसेच देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठीच्या पोलिसांच्या महत्वाकांक्षेचे आणि समर्पणाचे मी अगदी मनापासून आभार मानते’. असं राणीने म्हंटलं आहे.

‘मर्दानी २’ हा चित्रपट मुलींविरुध्द तसेच किशोरवयीन मुलांच्या गुन्ह्यांत होणाऱ्या वाढीवर भाष्य करणारा आहे. कोटा शहरात एका तरुणीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने केला गेलेला बलात्कार आणि तिचा खून या घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण राजस्थान मध्ये झालं असून, येत्या १३ डिसेंबरला चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.