Rani Mukerji : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जी हिला ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आलं आहे. तिच्या ३० वर्षांच्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत हा पहिलाच नॅशनल अवॉर्ड आहे. त्यामुळे हा क्षण तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी अत्यंत खास ठरला आहे. वडिलांना डेडिकेट केला पुरस्कार पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जी खूप भावुक झाली. तिनं हा पुरस्कार आपल्या दिवंगत वडील राम मुखर्जी यांना डेडिकेट केला. राणी म्हणाली, “माझे वडील नेहमीच हा क्षण माझ्या आयुष्यात यावा असं स्वप्न पाहायचे. आज हा सन्मान मिळाल्यावर मला त्यांची खूप आठवण येते. त्यांच्या आशीर्वादामुळेच आज मी इथे आहे.” आई आणि चाहत्यांचे आभार राणी मुखर्जीने आपल्या आईचेही विशेष आभार मानले. “आईची ताकद आणि प्रेरणा यामुळेच मी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’मधील भूमिका इतक्या ताकदीने करू शकले,” असं ती म्हणाली. त्याचबरोबर तिने आपल्या फॅन्सचंही आभार मानले. “चाहत्यांचा प्रेमळ आधारच माझ्यासाठी सर्वात मोठं मोटिव्हेशन आहे. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मला आधार दिला,” असं राणीने सांगितलं. संपूर्ण टीमसाठी गौरव या पुरस्काराला राणी मुखर्जीने फक्त स्वतःपुरतं न ठेवता संपूर्ण चित्रपट टीमला डेडिकेट केलं. “या चित्रपटाची ताकदीची गोष्ट उभी करण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमनं मनापासून मेहनत घेतली. त्यामुळे हा पुरस्कार त्यांचाही आहे. हा क्षण आणि ही ओळख माझ्यासाठी कायम स्मरणीय राहील,” असे राणी म्हणाली. तिने पुढे सांगितले की हा पुरस्कार जगभरातील सर्व मातांना अर्पण आहे, कारण त्या शक्ती, धैर्य आणि नि:स्वार्थ प्रेमाचं प्रतिक आहेत.