पुणे जिल्हा | भुलेश्वरला रंगली कावड, पालखी मिरवणूक

वाघापूर, (वार्ताहर) – माळशिरस (ता. पुरंदर) येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी दिवसभरात 50 हजारांपेक्षा अधिक भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेऊन हर हर महादेवचा जयघोष केला. तसेच कावड व पालखी मिरवणूक पहाटे तीन वाजता मानक-यांच्या उपस्थितीत शिवलिंगावरती दही, दूध व पंचामृतने आंघोळी घालून अभिषेक करण्यात आला.
शिवलिंगावरती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटे पाच वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली. या वेळी माळशिरस गावच्या सरपंच आरती यादव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव, श्री भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता माळशिरस येथील काळे वाड्यातून श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थानच्या पालखीचे भुलेश्वराकडे प्रस्थान करण्यात आले. वन विभागात पालखीला विसावा देण्यात आला.
त्यानंतर देवाची पालखी दुपारी बारा वाजता पाण्याच्या कुंडाजवळ आली. भुलेश्वर देवास प्रमुख मानकरी व माळशिरस ग्रामस्थांच्या उपस्थितीत आंघोळ घालण्यात आली. महाआरती होऊन कावड मिरवणुकीत काढण्यात आली.
पाठीमागे पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी अडीच वाजता भुलेश्वर देवस्थानच्या प्रवेशद्वारावर मानाच्या कावडींची धार घालण्यात आली. महाआरती होऊन भुलेश्वर देवाच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या यात्रेची सांगता करण्यात आली.
देवाचा छबिना वाजत गाजत मुख्य शिवलिंगाजवळ आला. प्रमुख मानकरी व माळशिरस ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली.
आश्वासन हवेतच विरल
भुलेश्वर येथील याञा नियोजन बैठकीत वन विभागाच्या हद्दीतील रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते माञ पहीला सोमवार झाला तरी रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही.यामुळे माळशिरस ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. श्रीक्षेत्र भुलेश्वर : शिवलिंगाची बांधलेली आकर्षक पूजा.





